कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट; मद्यधुंद मुलाचा वडिलांवर प्राणघातक हल्ला, ७० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 21:00 IST2025-12-21T21:00:39+5:302025-12-21T21:00:39+5:30
सोलापुरात कौटुंबिक वादाचा टोकाचा शेवट पाहायला मिळाला असून मुलाने वडिलांचा ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे.

कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट; मद्यधुंद मुलाचा वडिलांवर प्राणघातक हल्ला, ७० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू
Solapur Crime: सोलापूरातील मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथे वडील-मुलामधील दीर्घकाळ चाललेल्या कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. शेतातील वाटणी, जनावरे पिकात जाणे तसेच घरात पाणी भरू न देणे, या कारणांवरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मुलानेच जन्मदात्या पित्याच्या डोक्यात दगड घालून निघृण खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, आरोपी काशिनाथ महादेव पुजारी यास अटक केली आहे. महादेव कुसाप्पा पुजारी (वय ७०), असे मयत पित्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास डोणज येथील अशोक रामचंद्र मलगोंडे यांच्या पडीक जमिनीत ही घटना घडली. मयत महादेव कुसाप्पा पुजारी (वय ७०) यांचा मुलगा काशिनाथ महादेव पुजारी (४०) याच्याशी शेतवाटप व जनावरांच्या वादावरून वारंवार खटके उडत होते. याच रागातून काशिनाथने वडिलांच्या डोक्यात दगड घालून गंभीर दुखापत केली. उपचारापूर्वीच महादेव पुजारी यांचा मृत्यू झाला.
या घटनेची तक्रार विकास विश्वल कोरे (वय २२, रा. डोणज) यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बनकर करीत आहेत. या घटनेमुळे डोणज परिसरात खळबळ उडाली आहे.
नशेचा अंमल, वादाची ठिणगी
आरोपी काशिनाथ पुजारी हा घटनेच्या दिवशी अमावास्येला आरकेरी येथील देवस्थानला जाऊन आला होता. परत घरी आल्यानंतर दारू पिऊन नशेत असतानाच त्याने हे कृत्य केल्याची चर्चा आहे. मुलगा व्यसनाधीन असल्याने मालमत्ता खर्च होऊ नये, या हेतूने वडिलांनी जमीन वाटपास नकार दिला होता, अशी चर्चा गावात रंगली होती.