मोठा गौप्यस्फोट! निवडणुकीत एका मतासाठी ३ हजार मोजले, पार्ट्या केल्या; सेना आमदाराची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 02:34 PM2021-10-18T14:34:03+5:302021-10-18T14:36:28+5:30

शिवसेना आमदारांनी एका कार्यक्रमात बोलताना निवडणूक जिंकण्यासाठी काय काय क्लृप्त्या केल्या, आमिषे दाखवली याचा एक प्रकारे कबुली जबाबच दिला.

shivsena mla shahaji patil reveal that how bribes to voters to win sangola sugar mill elections | मोठा गौप्यस्फोट! निवडणुकीत एका मतासाठी ३ हजार मोजले, पार्ट्या केल्या; सेना आमदाराची कबुली

मोठा गौप्यस्फोट! निवडणुकीत एका मतासाठी ३ हजार मोजले, पार्ट्या केल्या; सेना आमदाराची कबुली

Next
ठळक मुद्दे५७ लाख रुपये वाटून निवडणूक लढवलीमतदारांना तीन- तीन हजार रुपये रोख वाटले १७०० सभासदांना कोल्हापुरात ठेवले

पंढरपूर: साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये होत असलेला पैशांचा वापर आणि निवडणुकांचे धक्कादायक वास्तव समोर आणणारा मोठा गौप्यस्फोट शिवसेनेच्या एका आमदाराने केला आहे. शिवसेना आमदारांनी एका कार्यक्रमात बोलताना निवडणूक जिंकण्यासाठी काय काय क्लृप्त्या केल्या, आमिषे दाखवली याचा एक प्रकारे कबुली जबाबच दिला. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांची माफीही मागितली. निवडणूक लढवताना एका मतासाठी ३ हजार मोजले, पार्ट्या केल्या, असे शिवसेना आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) यांनी मान्य केले. 

काही वर्षांपूर्वी झालेल्या सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या (Sangola Sugar Factory Election) निवडणुकीत मतदारांना तीन- तीन हजार रुपये रोख वाटले, शिवाय त्यांना हव्या तितक्या पार्ट्याही दिली. त्या काळात ५७ लाख रुपये वाटून कारखान्याची निवडणूक लढवली, असा मोठा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील  यांनी केला आहे. सांगोला सहकारी कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील आणि तालुक्यातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते. 

त्या काळात ५७ लाख रुपये वाटून निवडणूक लढवली

सांगोला साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांच्याकडे माझे काही संचालक घ्या, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी गणपतराव देशमुख यांनी वेळ निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर दिल्ली, हरियाणा, लुधियाना येथून विमानाने सभासदांना आणले. एवढेच नाही तर सभासदांना तीन तीन हजार रुपये वाटप केले. निवडणुकीदरम्यान १७०० सभासदांना कोल्हापुरात ठेवले. त्यांच्या खाण्यापिण्याची व पत्ते खेळण्यासाठी लागणारे पैसेही दिले, असे सांगत कारखान्याच्या दुरवस्थेला माझ्यासह सर्वच नेते जबाबदार आहेत. आपणही तितकेच पापी असल्याची कबुली पाटील यांनी दिली. 

कारखान्याच्या दुरवस्थेला आम्ही जबाबदार

साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना पैसे वाटून आणि पार्ट्या करून कारखान्याच्या निवडणुकीत गणपतराव देशमुख गटाला कसा हिसका दाखवला, हे सांगताना आमदार पाटील यांनी कारखाना उभारणीमध्ये कोणी कोणी कसा गैरकारभार केला, याची उदाहणे दिली. कारखान्याच्या दुरवस्थेला आम्ही जबाबदार असल्याचेही मान्य केले. आमदार पाटील यांच्या कबुलीनंतर सहकारी साखर कारखान्यात चालणाऱ्या गैर कारभाराचे जळजळीत वास्तव आणि सत्य समोर आले आहे.

दरम्यान, वाकी शिवणे (ता. सांगोला) येथील सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना अलीकडेच राज्य सहकारी बॅंकेने पंढरपूर येथील उद्योगपती अभिजित पाटील यांच्या धाराशिव साखर कारखान्याला २५ वर्षांच्या भाडेपट्टा कराराने चालवण्यास दिला आहे. अभिजित पाटील यांनी अवघ्या दीड महिन्यात कारखाना सुरू केला. कारखान्याचा प्रथम गळीत हंगामाचा प्रारंभ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला.
 

Web Title: shivsena mla shahaji patil reveal that how bribes to voters to win sangola sugar mill elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.