कराडप्रकरणी अधिकार क्षेत्रातच दाद मागा; सोलापुरातील कोर्टाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:36 IST2025-01-22T12:36:01+5:302025-01-22T12:36:31+5:30
सुशील कराडतर्फे अॅड. संतोष न्हावकर यांनी लेखी म्हणणे दाखल केले व त्यासोबत बीड पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रेही दाखल केली होती.

कराडप्रकरणी अधिकार क्षेत्रातच दाद मागा; सोलापुरातील कोर्टाचे आदेश
सोलापूर : वाल्मीक कराड यांचा मुलगा सुशील कराड याच्याविरोधात सोलापूरच्यान्यायालयात दाखल झालेली खासगी फिर्याद, परळीतील घटनास्थळ सीमेच्या न्यायालयात दाद मागण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे.जे. मोहिते यांनी दिले.
सोलापुरातील महिला व तिचा पती व दोन मुले परळी येथे राहण्यास होते. तेव्हा तिचा पती सुशील वाल्मीक कराड याच्या ट्रेडर्समध्ये कामास होता. सुशील कराड हा तिच्या पतीस तू दोन बल्कर ट्रक, दोन कार व जागा कसे काय कमावला म्हणून मारहाण केली होती. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पतीकडून सर्व वाहने स्वतःच्या ऑफिसला मागवून घेतले. पीडितेच्या नावे असलेला प्लॉट हा अनिल मुंडे याच्या नावावर करून घेतला. महिलेच्या लहान मुलीस मारहाण केली, तसेच तिच्या पतीचे अडीच तोळ्यांचे सोने हे परळी येथील बालाजी टाक ज्वेलर्सला बळजबरीने विकायला लावले. भीतीपोटी सोलापूरला आल्यावर सुशील कराड याने पीडिता परळीत राहत असलेल्या घरमालकाच्या मोबाइलवरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली, अशा आशयाची खासगी तक्रारवजा फिर्याद सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली होती. सुशील कराड, अनिल मुंडे, गोपी गंजेवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश करण्याची विनंती केली होती. न्यायाधीशांनी परळी येथील योग्य न्यायालयात दाद मागण्याचे आदेश देऊन फिर्याद पीडितेला परत दिली. याप्रकरणी पीडित महिलेतर्फे अॅड. विनोद सूर्यवंशी, तर आरोपीतर्फे अॅड. संतोष न्हावकर, अॅड. राहुल रूपनर यांनी काम पाहिले.
आरोपीच्या वकिलांनी सादर केले म्हणणे
सुशील कराडतर्फे अॅड. संतोष न्हावकर यांनी लेखी म्हणणे दाखल केले व त्यासोबत बीड पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रेही दाखल केली होती. तपासी अहवालासोबत फिर्यादीचा घेतलेल्या जबाब दाखल केला. त्यामध्ये फिर्यादीने पोक्सोच्या घटनेबाबत व सोलापूरमध्ये घडलेल्या कथित घटनेचा उल्लेख केला नसल्याने या न्यायालयाचे अधिकार क्षेत्रात प्रस्तुत गुन्हा येत नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.