पेट्रोल पंपातून बाहेर पडणाऱ्या स्कॉर्पिओला अचानक आग; कोणतीही जिवितहानी नाही
By आप्पासाहेब पाटील | Updated: May 2, 2025 19:06 IST2025-05-02T19:06:16+5:302025-05-02T19:06:37+5:30
वाढत्या तापमानामुळे वायरिंग शॉटसर्किटमुळे गाडीने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीने लोकमत शी बोलताना सांगितले.

पेट्रोल पंपातून बाहेर पडणाऱ्या स्कॉर्पिओला अचानक आग; कोणतीही जिवितहानी नाही
सोलापूर : मंगळवेढा महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाढत्या तापमानामुळे वायरिंग शॉटसर्किटमुळे गाडीने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीने लोकमत शी बोलताना सांगितले.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोलापूरचे कमाल तापमान ४४ अंशावर पोहोचले असून वाढत्या उन्हामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे काही दिवसापूर्वी अक्कलकोट व हैदराबाद महामार्गावर बस पेटली होती. एवढेच नव्हे तर बुधवारी नवीपेठेतही दुचाकीने अचानक पेट घेतला होता. या घटना ताज्याच असताना शुक्रवारी दुपारी मंगळवेढा महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ स्कॉर्पिओ ने पेट घेतला आहे.
पेट्रोल पंपातून बाहेर पडणाऱ्या स्कॉर्पिओला आग लागल्यानंतर पेट्रोल पंपावरील सर्व सुरक्षा उपाययोजना कडक करण्यात आल्या व पंप निर्मनुष्य करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आगीच्या घटनांमुळे अग्निशामक दलाचे पथक सतत सतर्क असून घटनेनंतर काही वेळातच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या.