आर्मी मॅन आहे म्हणत चौकीत येऊन पोलिसांना शिवीगाळ!
By रवींद्र देशमुख | Updated: July 27, 2023 17:43 IST2023-07-27T17:43:02+5:302023-07-27T17:43:24+5:30
याबाबत कॉस्टेबल अक्षय प्रभाकर धर्माधिकारी (वय ४१, रा. स्वामी विवेकानंद नगर, हत्तूरे वस्ती) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्मी मॅन आहे म्हणत चौकीत येऊन पोलिसांना शिवीगाळ!
सोलापूर : होटगी रोडवरील औद्योगिक पोलिस चौकीत येऊन जोरजोरात आरडा ओरड करत पोलिसांना शिवीगाळ करत, त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कॉस्टेबल अक्षय प्रभाकर धर्माधिकारी (वय ४१, रा. स्वामी विवेकानंद नगर, हत्तूरे वस्ती) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी सिध्दप्पा सायबण्णा हिपळे ( वय ४२, रा. हत्तूरे वस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी धर्माधिकारी हे औद्योगिक पोलिस ठाण्यात कार्यरत असताना २६ जुलै राेजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आरोपी सिध्दप्पा हिपळे तेथे येऊन जोरजोरात आरडा ओरड करू लागला. त्यावेळी फिर्यादी यांनी विचारणा केली असता आरोपीने त्यांना अर्वाच्च भाषेत बोलत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्याना बोलवून घेतले. त्याच वेळी आरोपीने मी आर्मी मॅन आहे, तुझ्या साहेबाला, तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावर उभा करतो, चौकीत बसू देणार नाही असे म्हणत फिर्यादीला झोबांझोबी करत धक्काबुक्की केली.
दरम्यान त्यावेळी बीट मार्शल तेथे आले. त्यांनी समाजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाही शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद धर्माधिकारी यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून हिपळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.