सोलापूरमधील ‘इलेक्ट्रो’मध्ये अत्याधुनिक उपकरणांची खरेदी जोमात , आज समारोप, पाच दिवसांत ५० हजार ग्राहकांनी दिल्या भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 14:51 IST2018-02-06T14:49:06+5:302018-02-06T14:51:26+5:30

सोलापूरमधील ‘इलेक्ट्रो’मध्ये अत्याधुनिक उपकरणांची खरेदी जोमात , आज समारोप, पाच दिवसांत ५० हजार ग्राहकांनी दिल्या भेटी
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘इलेक्ट्रो-२०१८’ या प्रदर्शनास पाच दिवसांत ५० हजार ग्राहकांनी भेटी दिल्या. सर्व कंपन्यांच्या एकापेक्षा एक इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन व होम अप्लायन्सेसच्या अत्याधुनिक वस्तूंच्या प्रदर्शनात ग्राहक जोमात खरेदी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आज सहाव्या दिवशी या प्रदर्शनाचा समारोप होत आहे.
सव्वा एकर परिसरात सुमारे ३०० स्टॉल लावण्यात आले आहेत. घरगुती आवश्यक असलेली विविध कंपन्यांची उपकरणे पाहावयास व विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. गुडगाव, दिल्ली येथील कारागिरांनी कंपनीच्या रचनेनुसार आकर्षक पद्धतीने स्टॉल मांडले आहेत. साध्या इस्त्रीपासून टी.व्ही., फ्रीज, कुलर आदी अनेक गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन पाहून ग्राहकांना खरेदी करण्याचा मोह आवरत नाही. ग्राहकांना स्टॉल पाहण्यासाठी आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. ग्राहकांना ठिकठिकाणी बसण्यासाठी सोफासेट, पिण्याच्या पाण्याची आणि सेल्फी घेण्यासाठी सेल्फी पॉइंट करण्यात आले आहेत. एकाच छताखाली सर्व कंपन्यांच्या वस्तू पाहण्याची व खरेदी करण्याची सुवर्णसंधी सध्या सोलापूरकरांना मिळत आहे.
---------------
यंदाच्या वर्षी प्रदर्शनात खूप सुधारणा केल्या आहेत़ त्यामुळे ग्राहक समाधानी आहे. दरवर्षी तिकीट खरेदी करण्यासाठी काउंटरवर मोठी गर्दी होत असते़ यंदा आॅनलाईनचीसुद्धा सोय केल्याने ग्राहकांना सोईचे झाले आहे. अंतर्गत गार्डन, रस्ते सुटसुटीत केले आहेत. संपूर्ण असोसिएशन यासाठी परिश्र घेत आहे़
- सतीश मालू,
सुयोग इलेक्ट्रॉनिक्स.
----------------
सेडाच्या वतीने वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातात. त्यापैकीच हा एक उपक्रम आहे. या प्रदर्शनात शहरातील सेडाच्या प्रत्येक सदस्याला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यात आला आहे. ग्राहकांना सर्व कंपन्यांचे ब्रॅण्ड या ठिकाणी पाहावयास व खरेदी करण्यास मिळत आहेत़ ग्राहक समाधानी होऊन जात आहेत.
-खुशालचंद देढीया, अध्यक्ष, सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन.
------------------------
वर्षातून एकदा होणाºया इलेक्ट्रो प्रदर्शनाचे सहा दिवस आमच्यासाठी एका उत्सवाप्रमाणे असतात. ज्या पद्धतीने आपण एखाद्या सणाची वाट पाहतो त्याप्रमाणे आम्ही या प्रदर्शनाची वाट पाहत असतो. या प्रदर्शनात सर्व कंपन्यांच्या वस्तूंची विक्री होते. यातून अडीच ते तीन हजार लोकांना रोजगार मिळतो. कमवा, शिका या योजनेप्रमाणे विद्यार्थी प्रदर्शनात काम करतात. लाखो ग्राहकांना याचा फायदा होतो.
-शिवप्रकाश चव्हाण, माजी अध्यक्ष, सेडा
---------------------
इलेक्ट्रो प्रदर्शन सोलापूरच्या ग्राहकांसाठी एक मोठी पर्वणी असते. आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची खरेदी या ठिकाणी करता येते. या ठिकाणी येणारा प्रत्येक ग्राहक आनंदी होऊन जातो. शहर व ग्रामीण भागातून लाखो ग्राहक प्रदर्शनास भेट देत आहेत. ग्राहकांचे समाधान हाच असोसिएशनचा उद्देश आहे. -जितेंद्र राठी, चेअरमन, सेडा