सोलापूर शिवजन्मोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी रसूल पठाण यांची निवड, शिवभक्त मुस्लीम तरुणास मिळाली संधी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 14:54 IST2018-02-06T14:53:14+5:302018-02-06T14:54:51+5:30
शहरातील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी शाब्दी सोशल गु्रपचे अध्यक्ष रसूल पठाण यांची निवड करण्यात आली़

सोलापूर शिवजन्मोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी रसूल पठाण यांची निवड, शिवभक्त मुस्लीम तरुणास मिळाली संधी !
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : शहरातील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी शाब्दी सोशल गु्रपचे अध्यक्ष रसूल पठाण यांची निवड करण्यात आली़ शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी मुस्लीम समाजातील शिवभक्तास संधी देऊन मध्यवर्ती मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे़
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकारी निवडीची बैठक श्री छत्रपती शिवाजी मैदान, डाळिंबी आड, शिंदे चौक येथे झाली़ या बैठकीस परिवहनचे माजी सभापती राजन जाधव, मराठा महासंघाचे दास शेळके, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष धर्मा भोसले, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य सुनील रसाळ, संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांग डांगे, सुनील कामाठी, माजी उपमहापौर नाना काळे, अर्जुन सुरवसे, बाळासाहेब पुणेकर, बापूसाहेब डांगे, संभाजी ब्रिगेडचे श्रीकांत घाडगे, शिवसेना विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड आदी उपस्थित होते़ रसूल पठाण हे शाब्दी सोशल गु्रपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत़ मागील दोन वर्षांपासून शिवजयंतीनिमित्त शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मेघडंबरीला विद्युत रोषणाई करीत आहेत़ त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या बैठकीत त्यांच्याकडे यंदा अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला़ पठाण यांच्या निवडीने मुस्लिम समाजातील विविध संस्था, संघटनांनी अभिनंदन केले आहे़