‘बेवडा’ शब्दावरून प्रणिती - बनसोडे आमने सामने !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 14:10 IST2018-10-27T14:06:47+5:302018-10-27T14:10:13+5:30
दोन्ही लोकप्रतिनिधींमध्ये वैयक्तिक पातळीवर वाक्युद्ध पेटले आहे.

‘बेवडा’ शब्दावरून प्रणिती - बनसोडे आमने सामने !
सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांचा ‘बेवडा’ शब्द खासदार शरद बनसोडे यांना भलताच झोंबला असून या दोन्ही लोकप्रतिनिधींमध्ये वैयक्तिक पातळीवर वाक्युद्ध पेटले आहे.
सोलापूर येथील काँग्रेसच्या एका कार्यक्रमात जाहीर भाषणात बोलताना काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी बेवडा खासदार असा उल्लेख केला होता. त्यानंतर चवताळलेले भाजप खासदार शरद बनसोडे यांनी सोशल मीडियावर संतप्त वक्तव्याचा व्हिडीओ टाकला.
यात शरद बनसोडे यांनी म्हटले आहे की, निवडणूक लढवायची असेल तर आपली कामे सांगून समोरासमोर या. जनता ठरवेल कोणाला निवडून द्यायचे ते. मी व तुम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे बालिश वक्तव्ये व व्यक्तिगत आरोप करू नका. मी महिलांचा आदर करतो म्हणून तोंड बंद ठेवतोय, अन्यथा मुंबईत काय काय घडलं, याची मला पूर्ण माहिती आहे.
रेव्ह पार्टी, रेल्वेत पोहोचविण्यात येणारी अंडी हे सगळं उघड केलं तर तुमचं सोलापूरला येणं-जाणं बंद होऊन जाईल. तुमचे वडील उच्च स्थानावर राहिले आहेत, त्याला कलंक लावू नका. यापुढे तुम्ही आमदार म्हणून राहणार नाही. तुम्हाला हा शेवटचा इशारा आहे, अन्यथा मला कायदेशीर कारवाई करावी लागेल, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
बुधवारी काय म्हणाल्या होत्या प्रणिती?
- नगरोत्थान योजनेतून मंजूर असलेल्या मौलाली चौकातील रस्ते भूमिपूजनावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘सोलापूरचे दोन मंत्री एकच काम करतात. एकमेकांशी भांडणे करा, स्वत:चे गट सांभाळा आणि आम्ही मंजूर केलेल्या कामाची उद्घाटने करा. याला काय म्हणतात... आयत्या बिळात नागोबा, एवढंच यांचं काम. सोलापूरसाठी एक दमडी आणू शकले नाहीत, दोन मंत्री आणि एक बेवडा खासदार. माफ करा, मला असे शब्द घ्यावे लागत आहेत. इथे महिला आहेत, मात्र नाईलाज आहे. दुसरं काय बोलणार ?’
शुक्रवारी काय म्हणाल्या प्रणिती?
- मी परवाच्या कार्यक्रमात जे काही बोलले, ते लोकांच्या मनातील होते. मात्र त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना बीजेपीच्या खासदारांनी ज्या भाषेत आम्हाला धमकाविण्याचा प्रयत्न केला आहे, ते लांच्छनास्पद आहे. शिंदे परिवाराला गेल्या अनेक दशकांपासून सोलापूरकर खूप जवळून ओळखतात. आम्ही कसे आहोत, हे साºयांना माहीत आहे. त्यामुळे काय जाहीर करायचे ते करा, त्याला आम्ही घाबरत नाही.