कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी पोलिसांची कारवाई; ५ जणांना घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:17 IST2025-02-07T14:17:23+5:302025-02-07T14:17:37+5:30
१० ते १२ जण कार्यक्रम संपल्यानंतर सेल्फी काढण्याच्या बहाण्याने जवळ गेले. अचानक प्रणित मोरे याला बेदम मारहाण केली.

कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी पोलिसांची कारवाई; ५ जणांना घेतलं ताब्यात
सोलापूर : अभिनेता वीर पहारियावर केलेल्या कॉमेंट्समुळे कॉमेडियन प्रणित मोरे याला मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापकाने सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने ११ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २ फेब्रुवारी रोजी सात रस्ता येथील २४ के क्राफ्ट ब्रिव्हज रेस्टॉरंट येथे कॉमेडी शो कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमादरम्यान प्रणित मोरे याने अभिनेता वीर पहाडिया याच्यावर विनोद केला होता. याचा राग मनात धरून १० ते १२ जण कार्यक्रम संपल्यानंतर सेल्फी काढण्याच्या बहाण्याने जवळ गेले. अचानक प्रणित मोरे याला बेदम मारहाण केली. याबाबत त्याने सोशल मीडियावर घडलेला सर्व प्रकार पोस्ट करून पोलिसांनी फिर्याद घेतली नसल्याचा आरोप केला होता.
पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधून तक्रार देण्यास सांगितले होते. मात्र त्याने ऑनलाइन तक्रार दिली. दोन दिवसानंतर तो सोलापुरात येऊन पोलिस ठाण्यात सही करतो असे सांगितले होते. मात्र दरम्यान संबंधित हॉटेलचे व्यवस्थापक लक्ष्मण झेंडे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे
मारहाण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यावरून अमोल चव्हाण, गोविंद हेमरेड्डी, हरिष जाधव, हरिष ऊर्फ श्री आसादे, प्रकाश बोगलोलू (सर्व रा. सोलापूर) यांना सदर बझार पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नोटीस देऊन सर्वांना सोडून देण्यात आले आहे. अन्य ६ ते ७जणांचा शोध सुरू आहे.