Pierced goats made 'bane bane'; 'Gangs of thieves' blow up | भेदरलेल्या बोकडानं केलं ‘बेंऽऽ बेंऽऽ’; चोरट्यांच्या टोळीची उडाली ‘फेंऽऽ फेंऽऽ’

भेदरलेल्या बोकडानं केलं ‘बेंऽऽ बेंऽऽ’; चोरट्यांच्या टोळीची उडाली ‘फेंऽऽ फेंऽऽ’

ठळक मुद्दे- डोणगांव येथील वस्तीवर घडली चोरीची घटना- याप्रकरणात दोन महिलांसह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल- चोरीच्या घटनांनी परिसरात दहशत

- संताजी शिंदे

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील वस्तीसमोर बांधलेल्या पंधरा हजार रुपये किमतीच्या बोकडाला चोरून नेत असताना त्याचा बें ऽऽ बें ऽऽ असा आवाज ऐकून मालक पळत आला तेव्हा चोरांनी रिक्षा जागेवर सोडून तेथून पळ काढला. या प्रकरणी दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

रिक्षाचालक-नितीन सुभाष राठोड, चंद्रकांत भीमा गायकवाड, रत्नाबाई तुळशीदास गायकवाड, शारदाबाई विजय जाधव, राजू भीमू जाधव (सर्व रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दि.१८ फेब्रुवारी रोजी दुपारी उषा रामराव राठोड (वय ३६, रा. भोजप्पा तांडा, कवठे, ता. उत्तर सोलापूर) या डोणगाव येथील शेतात काम करीत होत्या. शेताच्या जवळ असलेल्या वस्तीवर त्यांनी बोकड बांधले होते. एक रिक्षा वस्तीजवळ येऊन थांबली. वस्तीवर पाण्याचा हौद असल्याने कदाचित पाणी पिण्यासाठी थांबले असावेत असा समज उषा राठोड यांचा झाला. 

उषा राठोड या खाली मान घालून काम करीत असताना, अचानक बोकड ओरडण्याचा आवाज आला. उषा राठोड यांनी मान वर करून पाहिले असता, वस्तीवर बांधलेले बोकड चोरटे रिक्षात घालून घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. आरडाओरड करीत त्या वस्तीच्या दिशेने धावत सुटल्या. तेव्हा आजूबाजूचे लोकही वस्तीच्या दिशेने धावले. त्यांनी जाणाºया रिक्षाला अडवले. तेव्हा शारदाबाई जाधव व राजू जाधव हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. लोकांनी रिक्षाचालक नितीन राठोड, चंद्रकांत गायकवाड व रत्नाबाई गायकवाड या तिघांना पकडले. तिघांना पकडल्यानंतर सलगरवस्ती पोलीस ठाण्याला फोन करून माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व तिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी उषा राठोड यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलीस हवालदार माळी करीत आहेत. 

मंद्रुप, कामती (बु.) येथे यापूर्वी गुन्हे दाखल 
- रिक्षा चालकाव्यतिरिक्त इतरांवर यापूर्वी शेतातील बोकड चोरून नेल्याप्रकरणी मंद्रुप पोलीस ठाणे व कामती (बु.) पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तिघांना बुधवारी न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायाधीशांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी दिली. 

रोज एक-दोन बोकडांची चोरी...
- ओळखीच्या व्यक्तीची रिक्षा करायची, त्यात बसून दक्षिण सोलापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागात फिरायचे. एखाद्या ठिकाणी सावज शोधायचा आणि चरणाºया बोकडाला पकडून रिक्षात घालायचे. बोकडाचे तोंड दाबून ते चोरून न्यायचे असा प्रकार नित्यनियमाने केला जातो. चोरून आणलेले बोकड ठरलेल्या मांस विक्री करणाºया व्यक्तीला विकून त्यात आलेले पैसे वाटून घेतले जातात. कधी एक, कधी दोन तर कधी तीन बोकड चोरून त्याची विक्री केली जात असल्याची चर्चा स्थानिक लोकांमध्ये केली जात होती. 

Web Title: Pierced goats made 'bane bane'; 'Gangs of thieves' blow up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.