पंढरपूर : आषाढीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा करताना अनुभवायला मिळणारा भाव तो अवर्णनीय आहे. पांडुरंग हा मनातला ओळखणारा देव आहे. पांडुरंगाला काही मागावे लागत नाही, महाराष्ट्रातील सर्व संकट दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने आम्हाला द्यावी, सर्व बळीराजाला सुखी करावे, आपल्या सर्वांना संत मार्गाने चालण्याची सद्बुद्धी द्यावी हेच पांडुरंगाला साकडे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्कार समारंभ दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार गोरे, विखे पाटील, आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. अभिजीत पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीमध्ये पांडुरंग पाहतो हे या वारीमध्ये व वारीच्या परंपरेमध्ये अति महत्त्वाचं आहे. एकमेकांसमोर नतमस्तक होतो. अशा प्रकार प्रत्येक जण दुसऱ्यामध्ये देव पाहतो हे जगामध्ये कुठेही अनुभव आला मिळत नाही. या परंपरेने आपल्या भागवत धर्माची पताका अडचणीच्या काळात देखील उंच ठेवली आहे. वारीची परंपरा कुठलीही तमा न बाळगता सातत्याने सुरू आहे. मुगल राजवटीमध्ये अनेक अत्याचार झाले तरीही परंपरा थांबली नाही, इंग्रज राजवटीत देखील ही परंपरा खंडित झाली नाही. यंदाच्या वर्षी वारीने नवीन विक्रम केला आहे. खूप मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून वारकऱ्यांना देण्यात आलेल्या सोयीसुविधानाबाबत मी आनंदी आहे. महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने चालला आहे, त्याचबरोबर अध्यात्मिक प्रगती देखील होत आहे. निर्मल वारी, हरित वारी व पर्यावरण वारी झाली. यामुळे आपल्या संतांनी दिलेला संदेश आपल्याला या वारीच्या निमित्ताने अनुभवायला मिळत असल्याचे मत देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केले.