वडापाव आणण्यासाठी गेलेल्या भावांचा अपघात; एक जण ठार, तर एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 21:18 IST2024-12-15T21:18:26+5:302024-12-15T21:18:48+5:30
ही घटना भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथील पंढरपूर ते वेळापूर जाणाऱ्या हायवेवर घडली आहे.

वडापाव आणण्यासाठी गेलेल्या भावांचा अपघात; एक जण ठार, तर एक गंभीर जखमी
Pandharpur Accident: वडापाव आणण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा कारशी अपघात झाला. यामध्ये एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथील पंढरपूर ते वेळापूर जाणाऱ्या हायवेवर घडली आहे. विनोद वसंत ननवरे (वय ३३, रा. भंडीशेगाव, ता. पंढरपूर), असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, गुरुदेव जीवन ननवरे (३५, रा. भंडीशेगाव, ता. पंढरपुर) हे त्यांच्या मुलांना खाण्यासाठी वडापाव घेण्यासाठी भंडीशेगावातील आझाद चौक येथे आले होते. त्यावेळी वडापाव घेण्यासाठी त्यांच्या चुलत भावाची मुले विनोद वसंत ननवरे (३३) व आकाश वसंत ननवरे (३१, दोघे रा. भंडीशेगाव, ता. पंढरपूर) हेदेखील तेथे वडापाव घेण्यासाठी आले. त्यानंतर ते दोघे वडापाव घेऊन घराकडे गेले. १० ते १५ मिनिटांनी गुरुदेव ननवरे घराकडे जाताना गावातील लोक हायवे रस्त्याकडे पळत जाताना दिसले. त्यामुळे गुरुदेव तेथे गेले त्यावेळी तेथे त्यांना (एमएच १४ डीएक्स ०७११) या क्रमांकाची कार व (एमएच १३ सीवाय ९२४९) या दुचाकीचा अपघात झाल्याचे समजले. या अपघातानंतर विनोद व आकाशला पंढरपुरातील लाइफलाइन हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले. तेथील डॉक्टरांनी विनोद मयत झाल्याचे सांगितले. तर आकाशवर उपचार सुरू केले.
दरम्यान, याप्रकरणी कारचालक प्रशांत बाळू आवताडे (रा. भोसे, ता. पंढरपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.