सोलापूरात खरेदीसाठी आलेल्या दांम्पत्यांचे एक लाखांचे गंठण पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 14:14 IST2018-10-11T14:11:23+5:302018-10-11T14:14:39+5:30
गावी जाता जाता मॉलमध्ये गेलेल्या दांम्पत्याच्या कारमधील एक लाखाचे गंठण चोरीला गेल्याने खरेदी महागात पडल्याचा अनुभव आला.

सोलापूरात खरेदीसाठी आलेल्या दांम्पत्यांचे एक लाखांचे गंठण पळविले
सोलापूर : गावी जाता जाता मॉलमध्ये गेलेल्या दांम्पत्याच्या कारमधील एक लाखाचे गंठण चोरीला गेल्याने खरेदी महागात पडल्याचा अनुभव आला. ही चोरी बुधवारी सायंकाळी ६.१५ ते ६.३0 दरम्यान झाली. शैलेश रमेश नाईकवाडी (वय-३३ रा. वडाची वाडी ता. मोहोळ) हे पत्नी समवेत सोलापूर येथे हॉस्पिटला आले होते.
उपचार करून ते पुन्हा गावी जात असताना त्यांनी भागवत चित्रमंदिर समोरील पार्किंगच्या जागेत कार उभी केली. दोघे खरेदी करण्यासाठी समोरील मॉल मध्ये गेले. दरम्यान अज्ञात चोरट्याने कारची काच फोडुन ड्रायव्हर सिटच्या खाली ठेवलेल्या पर्समधुन एक लाख रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले.
शैलेश नाईकवाडी हे खरेदी करून परत आले असता त्यांना गाडीची काच फुटल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गाडीतील पर्स पाहिली असता त्यातील सोन्याचे गंठण चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोसई गोडसे करीत आहेत.