The name of the night lockdown in Solapur; Hotels run late by pulling shutters | सोलापुरातील रात्रीचा लॉकडाऊन नावालाच; शटर ओढून उशिरापर्यंत चालतात हॉटेल्स

सोलापुरातील रात्रीचा लॉकडाऊन नावालाच; शटर ओढून उशिरापर्यंत चालतात हॉटेल्स

संताजी शिंदे

सोलापूर : राज्य शासनाने ३१ जानेवारीपर्यंत रात्रीचा लॉकडाऊन वाढविला असून, रात्री ११ नंतर बंदी असतानाही मद्यपींचा चिअर्सचा खेळ रंगलेला असतो. आतून शटर बंद करून अन्‌ दिवे बंद करून रात्री उशिरापर्यंत परमिटरूम, बीअर बार खुलेआम सुरू असतात. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रात्रीचा लॉकडाऊन नावालाच राहिला आहे.

राज्य शासनाने नियम व अटी घालून हॉटेल, परमिट रूम, बीअर बार उघडण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वच हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या कन्ना चौक, अशोक चौक, साखर पेठ, आदी भागांमध्ये परमिट रूम रात्री ११ नंतर बंद केल्याचे समोरील बाजूने दिसून येते. मात्र आतमध्ये सर्रासपणे ग्राहक दारू रिचविताना दिसून येतात. जुळे सोलापूर परिसर, होटगी रोड, विजापूर रोड, पुणे रोड, हैदराबाद रोड, अक्कलकोट रोड, आदी काही मार्गांवर असलेल्या परमिट रूममध्ये रात्रीची मैफील सुरू असते. वास्तविक पाहता सकाळी सात वाजल्यापासून परमिट रूमला सुरुवात होते. ती रात्री काही ठिकाणी दोन वाजेपर्यंत चालते. ज्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत दारू मिळते, त्या ठिकाणी ग्राहक जाऊन बसतात. मालकाची इच्छा नसली तरी त्यांना सर्व्हिस द्यावी लागते. सर्व्हिस दिली नाही तर भांडणे होऊन वाद निर्माण होण्याची शक्यता असते.

पोलिसाची गाडी दिसली की पाठविले जाते पाणी

रात्री राऊंडला आलेली पोलिसांची गाडी पाहताच हॉटेलमधील कामगार तत्काळ पाण्याच्या बॉटल घेऊन जातो. पेट्रोलिंगच्या अधिकार्‍यांशी नम्रपणे बोलत आणखी काही हवे आहे का साहेब? अशी विचारणा केली जाते. अधिकारी जर कडक असेल, तर हॉटेल बंद केलं का नाही? अशी पहिल्यांदा विचारणा करतो. अधिकाऱ्यांना सर्व काही बंद आहे असे सांगितले जाते. एकदा का पोलीस गाडी निघून गेली, की मग हॉटेल मालक सुटकेचा नि:श्वास टाकतो.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे रात्री अकरानंतर शहर व जिल्ह्यातील सर्व परमिट रूम, बीअर बार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. माझ्या मते, रात्री अकरानंतर सर्व काही बंद होतं. मात्र जरी रात्री उशिरापर्यंत परमिट रूम, बीअर बार चालू असतील, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा. आम्ही त्यांच्यावर नक्कीच कारवाई करू.

रवींद्र आवळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग.

  • बीेअर बार आणि परमिट रूम - ४५०
  • देशी दारू दुकाने- २२८
  • वाईन शॉप - ४२
  • बीअर शॉपी - ३५०

Web Title: The name of the night lockdown in Solapur; Hotels run late by pulling shutters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.