महावितरणची मोठी कारवाई; एकाच दिवशी ९२९ ठिकाणची वीजचोरी उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 17:32 IST2021-10-19T17:32:34+5:302021-10-19T17:32:40+5:30
महावितरणची मोठी कारवाई; ९० लाख ३ हजाराचा विजेचा अनधिकृत वापर उघडकीस

महावितरणची मोठी कारवाई; एकाच दिवशी ९२९ ठिकाणची वीजचोरी उघडकीस
सोलापूर : वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी महावितरणकडून वीजचोरीविरुद्ध धडाक्यात मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये तिसऱ्या एक दिवसीय मोहिमेत सोलापूर जिल्ह्यात ९२९ ठिकाणी ९० लाख ३ हजार रुपयांच्या अनधिकृत वीजवापराचा महावितरणकडून नुकताच पर्दाफाश करण्यात आला आहे.
--------
फौजदारी दाखल...
जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी जोडण्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत दोषी आढळलेल्या वीजचाेरांवर वीजचोरी व दंडाची रक्कम न भरणाऱ्यांविरुद्ध विद्युत कायदा २००३नुसार कलम १३५ अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
-------
शेकडो पथकांची कारवाई...
आर्थिक संकटात असलेल्या महावितरणने वीजहानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध नियमित कारवाईसह गेल्या ऑगस्टपासून पुणे प्रादेशिक विभागात एक दिवसीय विशेष मोहीम सुरु केली आहे. प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी याबाबत निर्देश दिले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागासह स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शेकडो पथकांद्वारे वीजचोरीविरुद्ध धडाक्यात कारवाई करण्यात येत आहे.
---------
परस्पर वीजजोडणी घेतल्यास कारवाई...
वीज वापरासाठी आकडे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे वीजचोरी करू नये, तर अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. यासोबतच वीजबिलांच्या थकबाकीपोटी ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, त्यांच्याही वीजजोडण्यांची तपासणी विविध पथकांद्वारे करण्यात येत आहे. परस्पर वीजपुरवठा सुरु करून घेणे किंवा शेजाऱ्यांकडून वीज घेण्याचा प्रकार आढळून आल्यास त्यांच्याविरुद्धदेखील कारवाई करण्यात येत आहे.
-------