विहिरीत तरंगताना दिसली आई आणि मुलगी; धक्कादायक कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:15 IST2025-02-11T16:13:14+5:302025-02-11T16:15:24+5:30
पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने या दोघांना विहिरीतून बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आले.

विहिरीत तरंगताना दिसली आई आणि मुलगी; धक्कादायक कारण आलं समोर
कुर्डूवाडी : घाटणे (ता. माढा) येथील हरिभाऊ जानू लोंढे यांनी गुरुवारी (दि. ६) दुपारी केलेल्या आत्महत्येचा विरह सहन न झाल्याने हताश झालेल्या त्याच्या पत्नीनेदेखील अवघ्या चार वर्षाच्या मुलीसह त्याच रात्री १२ ते १ वा दरम्यान गावातील सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. ९) सकाळी ११ वा. सुमारास उघडकीस आली. एकाच कुटुंबातील एकाच दिवशी तीन आत्महत्या झाल्याने गावात शोककळा पसरली.
जनाबाई हरिभाऊ लोंढे (३२) व मुलगी साजरी हरिभाऊ लोंढे (४) असे मयत झालेल्या मायलेकींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी (दि. ६) दुपारी हरिभाऊ जानू लोंढे (रा. घाटणे, ता. माढा) यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. पोटच्या सहा मुलींचे पुढे कसे काय होणार? या विचाराने हताश झालेली पत्नी ४ वर्षीय मुलगी साजरी हिला सोबत घेऊन घरातून निघून गेली होती.
विहिरीत तरंगताना दिसले दोघे
सर्वत्र शोध सुरू असताना गावातील शाळकरी मुलांना गावातील जानूबाई मंदिराच्या जवळील सार्वजनिक विहिरीत एक महिला व मुलगी पाण्यावर तरंगताना दिसली. मुलांनी ही गोष्ट गावातील ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर महिलेचे नातेवाइकही तिथे आले. त्यांनी बेपत्ता असलेल्या मायलेकी याच आहेत हे ओळखले. पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने या दोघांना विहिरीतून बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आले.