सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले
By मिलिंद कुलकर्णी | Updated: May 18, 2025 08:19 IST2025-05-18T08:19:10+5:302025-05-18T08:19:47+5:30
Solapur MIDC Fire news: घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पाहोचली असून पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जेसीबी व अन्य वाहनांची मदत घेऊन कंपनीचा काही भाग पाडून कामगारांचे बचाव कार्य सुरू आहे.

सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले
सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी भागातील एका टॉवेलच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीत तीन कामगार होरपळले असून पाच ते सहा जण अडकले आहेत.
सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाने आगीतून आतापर्यंत तिघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले असून आग अजूनही धुमसत आहे. अद्यापही आतमध्ये पाच ते सहा कामगार अडकले असल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पाहोचली असून पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जेसीबी व अन्य वाहनांची मदत घेऊन कंपनीचा काही भाग पाडून कामगारांचे बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत दहा ते बारा गाड्या अग्निशामक दलाच्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम वेगात सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अग्निशामक दलाचे प्रमुख राकेश साळुंखे यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी व महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.