पांडुरंग दर्शनाहून परतीचा प्रवास ठरला अखेरचा; लहानग्यासह तीन महिला भाविकांचा जागीच अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 21:57 IST2026-01-26T21:55:28+5:302026-01-26T21:57:04+5:30
पंढरपूर–मंगळवेढा रोडवरील शरदनगर येथे भीषण अपघात; आठ जण गंभीर, परिसरात हळहळ

पांडुरंग दर्शनाहून परतीचा प्रवास ठरला अखेरचा; लहानग्यासह तीन महिला भाविकांचा जागीच अंत
मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा : “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” असा जयघोष करत पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेला भाविकांचा प्रवास अखेर मृत्यूत संपल्याने मंगळवेढा तालुक्यात शोककळा पसरली आहे.
पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावरील शरदनगर येथे भाविकांनी भरलेल्या क्रूझर (एम.एच. १३ बी.एन. ७६८७) आणि ट्रक (एम.एच. ४६ बी.यू. ६६५१) यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका निष्पाप लहान मुलासह डोंबिवली व ठाणे येथील तीन महिला भाविकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर आठ जण मृत्यूशी झुंज देत आहेत.
ठाणे येथील भाविक श्रद्धेने व भक्तिभावाने गाणगापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर या देवस्थानांच्या दर्शनासाठी आले होते. रविवारी अक्कलकोट व गाणगापूर येथे दर्शन आटोपल्यानंतर सोमवारी सकाळी अक्कलकोट येथून क्रूझरने पंढरपूर गाठले. विठुरायाच्या चरणी माथा टेकवून समाधानाने परतीचा प्रवास सुरू असतानाच नियतीने काळाचा घाला घातला.
शरदनगर परिसरात झालेला हा अपघात इतका भीषण होता की क्रूझरच्या चालक बाजूचा भाग अक्षरशः चिरडला गेला. त्या बाजूला बसलेले भाविक जागीच गतप्राण झाले. अपघातानंतर घटनास्थळी हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. रडणाऱ्या जखमींचा आक्रोश, रक्ताने माखलेला रस्ता आणि निष्पाप लहानग्याचा निश्चल देह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, एपीआय विनोद लातूरकर, वाहतूकचे संभाजी यादव यांच्यासह वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे मंगळवेढा येथील खाजगी रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एका भाविकास पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
गंभीर जखमींमध्ये महिला व पुरुष भाविकांचा समावेश असून सहा ते सात जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे उपस्थितांनी सांगितले. देवदर्शनाच्या आनंदातून क्षणातच शोकाकुलतेत बदललेल्या या प्रवासामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. श्रद्धेचा हा प्रवास असा रक्तरंजित शेवट होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती.
पांडुरंग दर्शनातून परतीचा प्रवास ठरला अखेरचा
पांडुरंगाच्या दर्शनाने मन भरून आलेले भाविक सुखरूप घरी पोहोचतील, अशीच प्रत्येकाची अपेक्षा होती. मात्र नियतीने वेगळाच डाव मांडला. श्रद्धेने सुरू झालेला हा प्रवास रक्ताने माखलेल्या रस्त्यावर संपला. विठुरायाच्या चरणी मागितलेले आयुष्याचे समाधान मिळाले; पण त्याची किंमत काहींना प्राणांनी चुकवावी लागली. एका निष्पाप लहानग्यासह चार जीवांचा असा अंत कुणाच्याही काळजाला चटका लावणारा आहे. आज शरदनगरचा रस्ता मूक झाला असला, तरी त्या भाविकांच्या आठवणी, त्यांची अपूर्ण स्वप्ने आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश कायम मनात घुमत राहणार आहे.