कुऱ्हाडीने दोघांवर हल्ला; तरुण ठार, दुसरा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 21:19 IST2025-03-01T21:19:26+5:302025-03-01T21:19:40+5:30
एकाने लोखंडी कुऱ्हाड उचलून फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटावर जोरदार वार केला. त्यामुळे त्याला गंभीर इजा झाली.

कुऱ्हाडीने दोघांवर हल्ला; तरुण ठार, दुसरा जखमी
Solapur Crime: बार्शी तालुक्यातील मालवंडी गावात बाळूमामा मंदिर परिसरात झालेल्या किरकोळ वादातून दोघांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
नितीन लहू सलगर (वय २८, रा. मालवंडी, ता. बार्शी) असे मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत, महादेव अनिल थोरात (वय २०, रा. मालवंडी, ता. बार्शी) यांनी फिर्यादी दिली. या प्रकरणी मयूर कावरे, विशाल बारंगुळे, पृथ्वीराज काटे, प्रमोद पाटील (सर्व रा. मालवंडी, ता. बार्शी) या चौघांविरुद्ध बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी बाळूमामा मंदिरात आरतीसाठी गेला होता. आरती संपल्यानंतर आरोपीतील एकाने फिर्यादीकडे रागाने पाहत त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या पायावर पाय दिला. यावर फिर्यादीने 'तू माझ्या पायावर पाय का दिला?' असे विचारले असता, सर्व आरोपींनी एकत्र येत फिर्यादीवर अचानक हल्ला केला. त्यातील एकाने लोखंडी कुऱ्हाड उचलून फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटावर जोरदार वार केला. त्यामुळे त्याला गंभीर इजा झाली.
दरम्यान, या वादात हस्तक्षेप करून भांडण सोडवण्यासाठी आलेल्या नितीन सलगर यांना देखील आरोपींनी मारहाण केली. जखमीस खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील सलगर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत बार्शी तालुका पोलिसांना गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बालाजी वळसणे हे करत आहेत.