टिपरच्या चाकाखाली चिमुकली ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 13:38 IST2025-01-18T13:37:51+5:302025-01-18T13:38:13+5:30

मुलीला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Little girl killed under the wheels of a tipper | टिपरच्या चाकाखाली चिमुकली ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

टिपरच्या चाकाखाली चिमुकली ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Solapur Accident: मुलांना ट्युशनला घेऊन जात असताना, पाठीमागून येणाऱ्या टिपरने दिलेल्या धडकेत आईच्या पाठीमागे बसलेली सात वर्षाची चिमुकली चाकाखाली सापडून ठार झाली. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजता घडला. साक्षी मुन्ना कलबुर्गी (वय ७ वर्ष रा. कुर्बान हुसेननगर) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. 

साक्षी ही माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी यांची नात होती. साक्षी ही हिंदुस्थान कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दुसरीमध्ये शिकत होती. तिला ट्युशनला सोडण्यासाठी तिची आई रेणुका यांच्यासमवेत मोटारसायकल वर पाठीमागे बसवून नेत होती. पुढे पाच वर्षाचा मुलगा होता. मोटारसायकलवर जात असताना, घराच्या जवळ थोड्या अंतरावर गेल्या. तेवढ्यात पाठीमागून टिपरने धडक दिली, त्यात आई व पाच वर्षाचा मुलगा अभिजीत रस्त्याच्या कडेला पडले, तर साक्षी पाठीमागच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाली. हे लक्षात येताच, लोकांनी धाव घेतली. मुलीला बाहेर काढून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

संतप्त लोकांनी टिपरच्या काचा फोडल्या 

अपघातानंतर चिडलेल्या लोकांनी टिप्परच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. या रस्त्यावरून टिप्परची वाहतूक वाढली असून, यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. गतिरोधक करणे आवश्यक असताना, ते करण्यात आले नाही, असा आरोप लोकांनी केला. 

पळणाऱ्या ड्रायव्हरला पकडले 

अपघात झाल्यानंतर तत्काळ चालक उडी मारून पळून जात होता. नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पकडले, घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Little girl killed under the wheels of a tipper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.