coronavirus; लग्नासाठी वऱ्हाडी मंडळींनी फिरविली पाठ; कार्यालयाऐवजी मशिदीतच उरकले लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 19:39 IST2020-03-19T12:16:41+5:302020-03-19T19:39:13+5:30
कोरोनाचा परिणाम; लग्नसोहळ्याकडे पै-पाहुणे, वऱ्हाडी मंडळी, मित्रमंडळींनी पाठ फिरवली

coronavirus; लग्नासाठी वऱ्हाडी मंडळींनी फिरविली पाठ; कार्यालयाऐवजी मशिदीतच उरकले लग्न
करमाळा : कोरोना आजाराच्या भीतीमुळे शहरात आज दुपारी आयोजित लग्नसोहळ्याकडे वऱ्हाडी मंडळींसह सगेसोयरे व मित्रमंडळींनी पाठ फिरवली. त्यामुळे अत्तार कुटुंबीयांनी नवरदेवाची वरात न काढता व मंगल कार्यालयात लग्नसमारंभ न करता मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये मशिदीत कबूल..क़बूल म्हणत लग्न उरकले.
करमाळ्यातील इलाही नूरमोहम्मद अत्तार यांची मुलगी अंजुम व अहमदनगरच्या गुंडेगाव येथील हुसेन बाबा अत्तार यांचा मुलगा समीर यांचा बुधवारी करमाळ्यातील नालबंद मंगल कार्यालयात लग्नसोहळा आयोजित केला होता. अत्तार कुटुंबीयांनी सगेसोयरे, मित्रमंडळी या सर्वांना या सोहळ्याचे आवर्जून निमंत्रण दिले होते.
लग्नात हजारो पै-पाहुणे येतील यामुळे दीड ते दोन हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था मंगल कार्यालयात केली होती. पण कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे लग्नसोहळ्याकडे पै-पाहुणे, वऱ्हाडी मंडळी, मित्रमंडळींनी पाठ फिरवली. वधू-वराकडील मंडळींनी विचार करून नवरदेवाची वरात न काढता व मंगल कार्यालयात लग्नविधी न करता मशिदीत काझी यांनी लग्न उरकते घेतले.