सोलापूर जिल्ह्यातील 'वीरगळ' मोजताहेत शेवटच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:00 AM2018-03-12T11:00:32+5:302018-03-12T11:00:32+5:30

इतिहासाची साक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर, इतिहास सांगणारे वीरगळ आता अबोल होऊ लागलेत

The last element in calculating 'Veeragal' in Solapur district | सोलापूर जिल्ह्यातील 'वीरगळ' मोजताहेत शेवटच्या घटका

सोलापूर जिल्ह्यातील 'वीरगळ' मोजताहेत शेवटच्या घटका

googlenewsNext
ठळक मुद्देकोरीव लेख व चित्रांचा वापर करून उभारण्यात आलेली शिळा म्हणजे वीरगळचित्रे, मजकूर पुसट होण्याच्या मार्गावर

महेश कोटीवाले  
वडवळ: अनेक खेड्यांतून इतिहासकाळातील वैभवाची साक्ष देणाºया अज्ञात वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असलेले ‘वीरगळ’ शेवटच्या घटका मोजत आहेत. ऊन, पाऊस, वारा झेलत पडले असून, भविष्यात हे वीरगळ नामशेष झाल्यास त्यामागील त्या अज्ञात वीरांचा इतिहासदेखील नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मोहोळ तालुक्यातील पीरटाकळी, गोटेवाडी, सावळेश्वर (ही काही प्रातिनिधिक गावे) यासह अनेक गावात असे वीरगळ अनास्थेमुळे दुर्लक्षितच राहिले असून, एकेकाळचा इतिहास सांगणारे हे वीरगळ आता अबोल होऊ लागले आहेत.

अनास्थेमुळे किंवा अंधश्रद्धेमुळे या विरगळांनाच देवदेवता समजून गावातील मंदिराच्या कडेला किंवा इतरत्र ठेवून त्यावर तेल, हळद-कुंकू,अन्य पदार्थ वाहिले जात असून, यामुळे त्यावरील चित्रे, मजकूर पुसट होण्याच्या मार्गावर आहेत.

पीरटाकळी (ता. मोहोळ) येथे सध्या हनुमान मंदिराच्या बाहेर असे चार वीरगळ आहेत. याविषयी माहिती देताना अणवेकर यांनी या गावात वीरमरण आलेल्या पुरुषांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे वीरगळ असून, त्यांच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या त्यांच्या पत्नीचे प्रतीक म्हणून तिचा हात यावर कोरला असून, तिच्या हातात बांगड्यांचा चुडा आहे. वरील बाजूस सूर्य, चंद्र व शिवलिंग असून, ही सती शिळा असल्याचे सांगितले.

वीरगळ म्हणजे काय?

  • - गावाच्या व समाजाच्या हितासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोरीव लेख व चित्रांचा वापर करून उभारण्यात आलेली शिळा म्हणजे वीरगळ होय.

वीरगळाचे प्रकार

  • - गोवर्धन शिळा- गोधन रक्षणासाठी ज्याने बलिदान दिले, त्याची स्मृती जपण्यासाठी त्यावर गाई-बैल अशा खिलारी जातीची चित्रे असतात.
  • पालिया वीरगळ- सती शिळा: पतीला वीरमरण आल्यानंतर त्याची पत्नी सती जाण्याची प्रथा होती. प्रेताबरोबर तिचे आत्मदहन, सहगमन केले जायचे. ती सती जाताना तिला पालखीत बसवून नेले जात होते. असे चित्र असते. त्याला पालिया वीरगळ किंवा सती शिळा असे म्हणतात.
  • महात्मा वीरगळ- एखाद्या तपस्वी, साधू महाराजांचे ध्यानस्थ अवस्थेतील शिळा म्हणजे महात्म्यांची वीरगळ. 

 


इतिहास संशोधक आनंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन शिलालेखांचा अभ्यास सुरु असून, हा प्राचीन इतिहास शिळेच्या स्वरूपात आज असला तरी त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी आपल्या मानसिकतेत बदल करून हे सुरक्षित ठिकाणी याचा संग्रह केल्यास अनेक वर्षे हा इतिहास टिकणार आहे. हा अनमोल ठेवा आहे, जो पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.
-नितीन अणवेकर,
सोलापूर इंटॅक सदस्य
---------------
एखादा विषय आज घेतला आणि उद्या लगेच मार्गी लागेल, असे होत नसते. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. यासाठी प्रत्येकाला याची गरज वाटून त्या दृष्टीने चिकाटीने सकारात्मक राहून पाठपुरावा करणे गरजेचे आहे. विषय लावून धरणे व त्यासाठी सतत पाठपुरावा करणे हाच पर्याय आहे.
-सुभाष देशमुख,
सहकारमंत्री

Web Title: The last element in calculating 'Veeragal' in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.