कुत्र्यासाठी पोलीस ठाण्यात.. कुत्र्यामुळे दवाखान्यात ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:30 AM2019-01-22T10:30:51+5:302019-01-22T10:36:28+5:30

जामगावच्या शिवारात कुत्र्यांचा शेतकºयावर हल्ला 

Kunda police station in the hospital! | कुत्र्यासाठी पोलीस ठाण्यात.. कुत्र्यामुळे दवाखान्यात ! 

कुत्र्यासाठी पोलीस ठाण्यात.. कुत्र्यामुळे दवाखान्यात ! 

googlenewsNext
ठळक मुद्देदोन तालुक्यांत दोन विरोधाभासाच्या घटना माळशिरस तालुक्यात मालक सुखावला तर बार्शी तालुक्यात शेतकरी हबकला

एल. डी. वाघमोडे 

माळशिरस : २०१८ ला निरोप अन् २०१९ चे स्वागत होत असताना सदाशिवनगर (ता़ माळशिरस) येथील डॉ़ ज्ञानदेव ढोबळे कुटुंब व हॉस्पिटलचे कर्मचारी चिंताग्रस्त झाले, कारणही तसेच घडलेले. डॉ़ ढोबळे यांच्या कुटुंबातील सदस्य ‘जॅक’ नावाचा कुत्रा हरवलेला़ त्याची सर्वत्र शोधाशोध केली, पण सापडेना़ पोलीस ठाण्यातही कुत्रा हरविल्याची तक्रार दिली.

 निरा नदीच्या किनारी इतर कुत्र्यांसमवेत खेळताना डॉक्टरांच्या पुतण्याला दिसला़ त्याने तिथूनच डॉक्टरांना फोन केला़ डॉक्टर गळ्यात लाल पट्टा बांधलेला ‘जॅक’सारखा कुत्रा नदीच्या किनारी खेळतोय़ डॉक्टरांनीही लगेच रिप्लाय दिला़ त्याला जॅक म्हणून हाक मारा, तुमच्याकडे येतोय का बघा़ त्यांनी जॅक म्हणून हाक मारताच तो पळत आला़ त्याला गाडीत बसवून घरी आणले.

अकलूज येथील पशुवैद्यकीय अधिकाºयांकडून अवघ्या २४ दिवसांचे पिल्लू ६ हजार रुपयांना विकत घेतले होते. ढोबळे कुटुंबीयांनी त्याचे ‘जॅक’ असे नामकरण केले़ त्यानंतर तो या कुटुंबाचा एक सदस्य बनला़ रोज कुटुंबातील सर्वजण जेवायला बसले की तोही शेजारी बसायचा़ त्यालाही दुधासह अन्य पदार्थ खाऊ घातले जायचे़ रोज हॉस्पिटलमधून चकरा मारायचा़ डॉक्टरांच्या केबिनमध्ये येऊन बसायचा़ रुग्णांच्या सोबतही रमायचा़ हॉस्पिटलमधील कर्मचाºयांनाही त्याचा लळा लागला होता.

३१ डिसेंबर रोजी तो अचानक गायब झाला़ जेवणाच्या वेळी आला नसल्याने सर्वांनी शोधाशोध सुरू केली़ वाटले आसपास कुठेतरी असेल, मात्र जॅक रात्री उशिरापर्यंत घरी आलाच नाही़ त्यानंतर ढोबळे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले़ त्यांना काळजी वाटू लागली़ नातेवाईक व मित्रमंडळींच्या मदतीने त्याचा शोध सुरु केला.

ज्या ठिकाणी कुत्र्यांची खरेदी-विक्री होत असते, तेथेही ‘जॅक’चा फोटो देण्यात आला. मात्र पदरी निराशाच़ अखेर १७ जानेवारी रोजी डॉक्टरांनी माळशिरस पोलीस ठाण्यात धाव घेत कुत्रा हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनाही या तक्रारीचे आश्चर्य वाटले़ त्यांनी तपास सुरू केला.

१९ रोजी डॉक्टरांचा पुतण्या व माजी सरपंच राजाराम ढोबळे हे त्यांच्या कामानिमित्त वालचंदनगरला जाऊन परत नातेपुतेमार्गे येत होते़ अचानक त्यांचे लक्ष निरा नदीच्या किनारी खेळणाºया कुत्र्याकडे गेले़ त्याच्या गळ्यात लाल पट्टा असल्याचे नजरेस पडले़ त्यांनी लगेच डॉ. ढोबळे यांना फोन केला, या ठिकाणी आपल्या कुत्र्यासारखे दिसत असल्याचे सांगितले.

डॉक्टरांनी त्याला जॅक नावाने हाक मारण्यास सांगितले़ त्यांनी जॅक म्हणून हाक मारताच तो कुत्रा धावतच त्यांच्याकडे आला़ त्यामुळे त्याची ओळख पटली़ त्या कुत्र्याला गाडीत बसवून सदाशिवनगर येथील डॉक्टरांच्या घरी आणले़ त्यानंतर सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला.

आमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळलेला जॅक अचानक नाहीसा झाल्याने आम्ही चिंताग्रस्त झालो़ त्याचा ठिकठिकाणी शोध घेतला हा कोणीतरी चोरून नेला असेल काय अशीही शंका मनात आली़ त्यामुळे आम्ही पोलिसांत तक्रार दिली़ त्यानंतरही शोधमोहीम सुरूच ठेवली़ आता आमचा जॅक आम्हाला परत मिळाला आहे़
- डॉ़ ज्ञानदेव ढोबळे, सदाशिवनगर

जामगावच्या शिवारात कुत्र्यांचा शेतकºयावर हल्ला 

कुसळंब : शेतातील ज्वारी पाहण्यासाठी गेलेल्या बार्शी तालुक्यातील जामगाव येथील वृद्धावर तीन मोकाट कुत्र्यांनी अकस्मात हल्ला केला. यामुळे हा शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ज्ञानदेव मनोहर आवटे (७९ वर्षे) असे या शेतकºयाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली सविस्तर माहिती अशी, सोमवारी सकाळी १०.३० वाजता त्याच्या आवटे मळ्यात ज्वारी पाहण्यासाठी गेले होते. ज्वारी बघून बांधावरील आंब्याच्या झाडाखाली बसले असता अचानक तीन कुत्र्यांनी हल्ला केला.
त्यांच्या डोक्यास, उजव्या डोळ्याच्या भुवई, हातास, पायास, मांडीस चावून लचके घेतले. यामुळे त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याने शेजारील शेतकरी शिवाजी चित्राव व कालिदास आवटे यांनी मदतीसाठी धाव घेतली; मात्र कुत्र्यांनी त्या दोघांवरही चाल केली.
अखेर मोठ्या हिमतीने त्यांनी कुत्र्यांना दगडाने व काठीने हुसकावून लावले. ज्ञानदेव आवटे यांना या दोघांनी बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
गावकरी दहशतीत
या गावालगतच्या कत्तलखान्याच्या परिसरात नेहमीच मोठाली कुत्री असतात.लहान वासरे, जनावरे, बकºया यांच्यावर ते हल्ला करतात. तुकाराम आवटे यांच्या गोठ्यात शिरून जनावरांवरही त्यांनी हल्ला केला. यावेळी तर चक्क माणसावर हल्ला केल्याने गावकरी विशेषत: मुले व महिला दहशतीखाली आल्या आहेत.

Web Title: Kunda police station in the hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.