'उड्डाण पुलाखाली' चिमण्यांसाठी 500 किलो ज्वारीचा चारा बांधतोय 'दिलदार शेतकरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 04:24 PM2019-12-09T16:24:25+5:302019-12-09T16:26:32+5:30

गावच्या उड्डाणपूलाखाली चिमण्यांनी केली वस्ती  : पक्षीप्रेमापोटी  ज्वारीच्या ताटवे बांधून केली खायची सोय      

Keeping 500 kg of sorghum grains for sparrows, farmer of solapur halgur | 'उड्डाण पुलाखाली' चिमण्यांसाठी 500 किलो ज्वारीचा चारा बांधतोय 'दिलदार शेतकरी'

'उड्डाण पुलाखाली' चिमण्यांसाठी 500 किलो ज्वारीचा चारा बांधतोय 'दिलदार शेतकरी'

Next

सोलापूर - वाढत्या सिमेंटच्या  इमारतींमुळे शहरातून चिमण्यांची संख्या रोडावली आहे. चिमण्या या निसर्गचक्रातील महत्वाचा घटक आहेत . शेतीला उपद्रवमूल्य असलेले कीटक, नाकतोडे  यांचे भक्षण करीत रोगराईपासून शेतीचे रक्षण करण्याचे महत्वाचे काम चिमण्या करतात. अन्नसाखळीतील त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे .पक्षीप्रेमापोटी आपल्या शेतातील पाचशे किलो ज्वारी दरवर्षी चारा म्हणून देणारा हगलूर येथील प्रभाकर शिंदे या दानशूर  शेतकऱ्यांने यंदा गावच्या उड्डाणपूलाखाली ज्वारीचे ताटव्यांचे तोरण बांधून त्यांच्या खायची सोय केली आहे .                   
सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील हगलूर हे हजार पंधराशे लोकसंख्या असलेले गाव. रत्नागिरी ते नागपूर हा महामार्ग  या गावावरून जातो .नुकत्याच झालेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाने गावाजवळ उड्डाणपूल झाले. त्या पुलाच्या भिंतीतुन पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी  पाच ते सहा इंची पाइप टाकून वाट करून देण्यात आली आहे. त्या पाइपचे सत्तर ते ऐशी छिद्रे तैयार झाली असून तीच संधी साधून चिमण्यांनी इथे आपली वस्ती केली आहे. प्रत्येक छिद्रात चिमणा-चिमणी सुरक्षित राहत आहेत. विणीचा हंगाम असल्याने  अंडी अन पिलांच्या सुरक्षित्यासोबत त्यांना उब मिळण्यासाठी आसपास भटकंती करीत गवताच्या काड्या गोळा करून घरट्यात ठेवत आहेत. जवळपास दोनशे चिमण्या इथे वस्ती करून राहत आहेत .त्यांच्या चारापाण्याची सोय गावातील शेतकरी प्रभाकर शिंदे यांनी उत्तमरीत्या केली आहे .घरट्याच्या वरील बाजूस ज्वारीचे ताटवे बांधले असून त्यावर ताव मारण्यात चिमण्या गर्क असल्याचे दिवसभर दिसून येते .नेहमी शेतातील पक्षांना तांदूळ, गहू, ज्वारी देणाऱ्या शिंदे याना यंदा प्रथमच पुलाखालील चिमण्यांची वस्ती पाहून त्यांच्या चारापाण्याची सोय करावी असे सुचले .गावकऱ्यांच्या मदतीने पंधरा ते वीस फूट उंच ज्वारीचे ताटवे बांधले .सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाला .जसजसे त्यांच्या अंगवळणी पडले तसे चिमण्यां खाण्यासाठी तुटून पडत आहेत .ताटव्यांतील दाणे संपले की पंधरा वीस दिवसांनी ते बदलून नवीन ताटवे बांधत असल्याचे  प्रभाकर शिंदे यांनी सांगितले .या शेतकऱ्याची दानत पाहता निसर्गचक्र अबाधीत राहण्यासाठी पशुपक्ष्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून ती सर्वाची सामूहिक जबाबदारी हाच संदेश या सहजकृतीतून मिळतो.

मानवी वस्तीशी सलगी करून राहणाऱ्या  शहरातून चिमण्यांची संख्या रोडावली असा एक मतप्रवाह मागील काही वर्षांपासून ऐकावयास मिळत आहे .मोबाईलच्या रेडीयशनचा त्यांना त्रास होतो असा निष्कर्षही काढण्यात आला. पण अलीकडच्या काळात मात्र मोबाईल च्या टॉवरवरच चिमण्यां व इतर पक्ष्यांचे थवे दिसून येत आहेत .त्याना त्याची सवय झाल्याने शहरात ही झाडी झुडपे,पाणथळ असलेल्या ठिकाणी चिमण्यांचे थवे दिसून येत असल्याचे सकारात्मक चित्र पहावयास मिळत आहे. निवाऱ्याच्या सोयीअभावी  शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात शेतशिवारात मात्र त्यांची लक्षणीय वाढ होत आहे. 

प्रभाकर शिंदे, शेतकरी हगलूर 
मला लहानपणापासून पक्ष्यांना चारा घालण्याची सवय आहे. वाढवडीलांकडून ही शिकवण मिळाली असून त्यातून बरकत मिळते असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मी माझ्या शेतातील पिकांवरील दाणे खाणाऱ्या पक्षाना मनसोक्त खाऊ देतो. तसेच पाच क्विंटल ज्वारी दरवर्षी या चिमण्या आणि इतर पक्ष्यांकरिता खाण्याकरिता उपलब्ध करून देतो. यातच मला समाधान मिळते .

Web Title: Keeping 500 kg of sorghum grains for sparrows, farmer of solapur halgur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.