Instead of Diwali, the CRPF Jawan, who is going on holiday at Shiv Jayant, teaches his house! | दिवाळीऐवजी शिवजयंतीला सुट्टीवर गावी येणारा सीआरपीएफ जवान घरोघरी शिकवितोय जलनीती !

दिवाळीऐवजी शिवजयंतीला सुट्टीवर गावी येणारा सीआरपीएफ जवान घरोघरी शिकवितोय जलनीती !

ठळक मुद्देपाणी बचाव मोहिमेची जनजागृती; कर्देहळ्ळीत घरोघरी जाऊन पत्रकाद्वारे देताहेत संदेशपाणी बचत चळवळ राबवून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन करणार राजे शिवछत्रपतींच्या जलनीतीचा आधार घेत पौळ हे गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन ‘पाणी वाचवा’चाही संदेश

सोलापूर : ‘जल है तो कल है’, हा संदेश घेऊन यंदाच्या शिवजयंतीनिमित्त खास सुटी घेऊन गावी आलेले सीआरपीएफ जवान अमोल चांगदेव पौळ हे आपल्या मूळगावी (कर्देहळ्ळी) पाणी बचत चळवळ राबवून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन करणार आहेत़ राजे शिवछत्रपतींच्या जलनीतीचा आधार घेत पौळ हे गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन ‘पाणी वाचवा’चाही संदेश देताना दिसत आहेत.

एका सामान्य कुटुंबात जन्मलेले अमोल पौळ यांनी २००९ मध्ये ‘सीआरपीएफ’मध्ये (सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स) दाखल झाले. शालेय जीवनात त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्या विचारांनी प्रभावित झालेले पौळ यांनी दर शिवजयंतीला खास सुटी घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथील मूळगावी येतात. एरव्ही सुट्या घेत नसल्याने सीआरपीएफमधील संबंधित अधिकारी त्यांना खास शिवजयंतीनिमित्त १० ते १५ दिवसांची सुटी मंजूरही करतात. यंदाही ते कर्देहळ्ळीत दाखल झाले आहेत. 

‘सीआरपीएफ’मध्ये दाखल झाल्यावर सुरुवातीचे पाच महिने त्यांनी जम्मू-काश्मीरमधील बटोर येथे ड्यूटी बजावली. सध्या ते गडचिरोलीत कार्यरत आहेत. कर्देहळ्ळीत शिवविचारांची राजमुद्रा प्रतिष्ठान कार्यरत आहे. छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजेंची जयंती आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची परंपरा जवान अमोल पौळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कायम ठेवली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ते आपले सहकारी बाळासाहेब पौळ, विनोद जाधव आदींच्या मदतीने पाणी बचत चळवळीला गती देत आहेत. यंदा गावात कर्तृत्ववान महिला, शिक्षकांसह मान्यवरांच्या सत्काराचे आयोजनही करण्यात आल्याचे अमोल पौळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

देशभक्ती-शिवशक्तीचा असाही संगम
- अमोल पौळ यांनी २००८ मध्ये भगवा ध्वज फडकावून शिवविचारांच्या कार्याचा श्रीगणेशा केला. २००९ मध्ये सीआरपीएफमध्ये दाखल झाल्यावरही त्यांच्या कार्यात कधीच खंड पडला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलनीतीसह अनेक विचार आचरणात आणण्यासाठी दर शिवजयंतीला ते समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. कर्देहळ्ळीत दर शिवजयंतीच्या उपक्रमात देशभक्ती अन् शिवशक्तीचा संगम पाहावयास मिळतो.

केवळ शिवप्रतिमेला हार घालून शिवजयंती साजरी करण्यापेक्षा छत्रपतींच्या जलनीतीद्वारे यंदा घरोघरी ‘पाणी वाचवा’चा संदेश देणार आहे. ग्रामस्थही सहकार्य करीत आहेत. 
-अमोल पौळ, जवान- सीआरपीएफ

सीआरपीएफमधील जवान गावात येऊन शिवजयंती साजरी करताना शिवरायांचे विचार आठवतात. आजही अमोल पौळ यांची गावाशी असलेली नाळ तुटलेली नाही.
- कृष्णात पवार, सदस्य 

गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस पडला. येणाºया उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने ‘पाणी वाचवा’चा संदेश देत आहोत.
- रणजित सावंत, सदस्य 

Web Title: Instead of Diwali, the CRPF Jawan, who is going on holiday at Shiv Jayant, teaches his house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.