हा तर अविष्कार.. ZP शाळेतील डिसले गुरुजींना 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 03:53 PM2020-03-19T15:53:26+5:302020-03-19T16:15:04+5:30

जगातली सर्वोत्तम 50 शिक्षकांमध्ये सोलापूरच्या रणजितसिंह डिसले यांची वर्णी

This is an innovation .. a $ 10 million prize to a Marathi bearded ZP teacher ranjitsingh disale from solapur | हा तर अविष्कार.. ZP शाळेतील डिसले गुरुजींना 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार

हा तर अविष्कार.. ZP शाळेतील डिसले गुरुजींना 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार

Next

सोलापूर/मुंबई - शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे ग्लोबल टीचर प्राईझ जाहीर झाले असून जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची याकरिता निवड करण्यात आली आहे. लंडन येथील वाकी फौंडेशनच्या वतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार मे महिन्यात लंडन येथे होणाऱ्या ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात प्रदान करण्यात येतील. रणजितसिंह डिसले, विनिता गर्ग व शुवजीत पायने यांना याकरिता नामांकन मिळाले आहे. असा बहुमान मिळवणारे  डिसले गुरुजी एकमेव जिल्हा परिषद शिक्षक ठरले आहेत. 

जिल्हा परिषद शाळा म्हटलं की नाव ठेवणं, टिंगलटवाळी करणं किंवा सरकारी शाळांमधील उदासिनता.. असेच पाहणे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील रणजीतसिंह डिसले यांनी जिल्हा परिषद शाळा आणि याच शाळेतील शिक्षक वर्गाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील मुलांना जगाशी जोडण्याचं काम या टेक्नोसेव्ही गुरुजींनी केलं आहे. त्यामुळेच, जगभरात यांच्या कामाचं कौतुक होत आहे. देशाला जसे तुकाराम मुंढेंसारख्या सनदी  अधिकाऱ्याची गरज आहे, तशीच देशातील प्रत्येक शाळेला रणजीतसिंह डिसलेंसारख्या टेक्नोसेव्ही आणि मॉडर्न विचारांच्या गुरुजींची आवश्यकता आहे. भविष्यातील भारत घडविण्यासाठी हाच शिक्षकवर्ग मोठं योगदान देत असतो. 

लेट्स क्रॉस द बॉर्डर या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्त्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिका व उत्तर कोरिया या जगातील सर्वात अशांत देशांतील  50000 मुलांची पीस आर्मी तयार करून परस्पर सौहार्दाचे वातावरण करण्याच्या या शैक्षणिक प्रयोगाकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे. तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांना प्रेरणादायी आहे अशा शब्दात निवड समितीने त्यांचा गौरव केला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत मागील 11 वर्षांपासून कार्यरत असणारे डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज 11 देशांतील 10 कोटींहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हुन अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील 7 वे शिक्षक ठरले आहेत. मायक्रोसॉफ्ट, नॅशनल जिओग्राफीक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे. तसेच लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कारानेदेखील त्यांना गौरवण्यात आले आहे.

Web Title: This is an innovation .. a $ 10 million prize to a Marathi bearded ZP teacher ranjitsingh disale from solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.