If the petrol reaches a hundred, the old machine at the old fuel pump will have to be replaced! | पेट्रोलने शंभरी गाठल्यास जुन्या फ्युअल पंपावरील जुने मशीन बदलावे लागेल !

पेट्रोलने शंभरी गाठल्यास जुन्या फ्युअल पंपावरील जुने मशीन बदलावे लागेल !

सोलापूर : शहर व जिल्ह्यामध्ये पेट्रोल काही दिवसांत शंभरी गाठण्याची शक्यता आहे. पेट्रोल पंपावरील यंत्र (फ्युअल डिस्पेन्सरी मशीन) जुने असल्यास त्यावर शंभर रुपये प्रतिलिटरचा दर दर्शविता येत नाही. त्यामुळे असे जुने पंप बदलावे लागणार आहेत.

सोलापुरात पेट्रोलचा प्रतिलिटर दर हा ९६ रुपयांपेक्षाही पुढे गेला आहे. सध्या दरवाढीचा वेग पाहता लवकरच पेट्रोल शंभरी गाठेल असे दिसत आहे. सामान्य माणसांना पेट्रोलची भाववाढ सतावत असताना पेट्रोल पंप चालकांना जुने फ्युअल डिस्पेन्सरी मशीन बदलण्याची चिंता सतावत आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावरील फ्युअल डिस्पेन्सरी मशीनवर पेट्रोलचा दर दर्शविला जातो. सध्या या यंत्रावर दोन आकडी दर दर्शविण्याची (९६.८७ ) सोय आहे. जर पेट्रोलचा दर १०० रुपयांपर्यंत गेला तर जुने फ्युअल डिस्पेन्सरी मशीन बदलावे लागणार आहे. शहरात २४, तर जिल्ह्यात २२६ पेट्रोल पंप सुरू आहेत. त्यांपैकी काहीच पंपांवर ही अडचण उद्भवणार आहे.

कॅल्क्युलेटरने ग्राहकांचा वाढेल गोंधळ

जुने फ्युअल डिस्पेन्सरी मशीन न बदलल्यास पंपचालकांना कॅल्क्युलेटरची मदत घ्यावी लागेल. यंत्रावर १०० रुपयांपेक्षा कमी दर दाखवत असताना त्यापेक्षा जास्त दर आकारून पेट्रोलची विक्री केल्यास ग्राहकांचा गोंधळ वाढेल. या पद्धतीमुळे ते समाधानी होणार नाहीत; यामुळे ग्राहकांच्या तक्रारी पेट्रोल कंपन्यांना कळवून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे एका पेट्रोल पंपचालकाने सांगितले.

शहर तसेच जिल्ह्यामध्ये काही मोजकेच फ्यूअल डिस्पेन्सरी मशीन २०१७ आधीचे आहेत. २०१७ नंतर घेतलेल्या पंपामध्ये तीन आकडी दर दर्शविण्याची अडचण नाही. जुने यंत्र असणाऱ्यांनी आपले यंत्र अपडेट करून न घेता ते नवीनच घेणे जास्त सोईचे व स्वस्त असणार आहे.

- सागर दिंडे, अभियंता

पेट्रोलचा दर १०० गाठण्याआधीच तीनही पेट्रोल कंपन्यांकडून फ्युअल डिस्पेन्सरी मशीन बदलून दिली जाणार आहे. याबाबत कंपन्या जसे धोरण ठरवतील त्याप्रमाणे पेट्रोल पंपचालक व्यवहार करतील. अजून तरी कंपन्यांकडे आम्ही याबाबत विचारणा केलेली नाही.

- महेंद्र लोकरे, सचिव, सोलापूर जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशन

 

Web Title: If the petrol reaches a hundred, the old machine at the old fuel pump will have to be replaced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.