तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 06:32 IST2025-07-05T06:31:36+5:302025-07-05T06:32:35+5:30
आषाढी एकादशी सोहळा रविवारी पार पडणार आहे. तत्पूर्वीच लाखो भाविकांनी पंढरीत गर्दी केली आहे. पंढरपुरात आलेले भाविक प्रथम चंद्रभागा स्नान करीत होते.

तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
पंढरपूर : “उदंड पाहिले, उदंड ऐकले.. उदंड वर्णिले क्षेत्र मोहीम.. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर.. ऐसा विटेवर देव कुठे..?” या अभंगात तुकाराम महाराजांनी पंढरपूरचे केलेले वर्णन पाहण्यासाठी जणू राज्यातील विठ्ठलाचे भक्तगण चंद्रभागा तिरी जमल्याचे शुक्रवारी दिसून आले. नवमीपासूनच चंद्रभागेच्या दोन्ही तीरांवर भाविकांची गर्दी झाली होती.
आषाढी एकादशी सोहळा रविवारी पार पडणार आहे. तत्पूर्वीच लाखो भाविकांनी पंढरीत गर्दी केली आहे. पंढरपुरात आलेले भाविक प्रथम चंद्रभागा स्नान करीत होते. त्यानंतर चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत. वाळवंटात विविध खेळ खेळत आहेत. अभंग म्हणत, कीर्तन करीत नदीपात्रातील विष्णू मंदिरापर्यंत होडीतून प्रवास करून आनंद लुटत आहेत.
दर्शन रांग गेली गोपाळपूरच्या पुढे
पंढरपुरात १२ नंबरच्या पत्राशेड भरून दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेली आहे. दर्शन रांगेतील भाविकांनी मंदिर समितीकडून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विठ्ठल मंदिर परिसरात, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात गर्दी झाली आहे. या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावला आहे.
चंद्रभागा ओसरली
आषाढी एकादशी यात्रेच्या सोहळ्यादरम्यान चंद्रभागेत कमी प्रमाणात पाणी राहावे. यासाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. तसेच ते पाणी पुढे देखील सोडण्यात आले होते. यामुळे नदीपात्रातील पाणी ओसरले.