coronavirus; सोलापूरकडे येणारे लोंढे तपासणार कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:20 IST2020-03-20T12:15:16+5:302020-03-20T12:20:26+5:30
सोलापूर जिल्हा प्रशासनासमोर आव्हान; तपासणी पथक नेमण्याची मागणी

coronavirus; सोलापूरकडे येणारे लोंढे तपासणार कसे ?
राकेश कदम
सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई आणि पुण्यात ‘शटडाऊन’ची तयारी सुरू आहे. त्यामुळे या शहरातील नागरिकांचे लोंढे मूळ गावी सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यांची तपासणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. संशयित रुग्णांनी रुग्णालयात दाखल होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे.
सोलापुरातील लाखो लोक पुणे, हैदराबाद आणि मुंबईत रोजगारासाठी स्थायिक झाले आहेत. पुणे आणि मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबई विमानतळावर प्रतिबंध घातल्यामुळे अनेक विमाने पुणे विमानतळावर उतरत आहेत. पुण्यात उतरलेली मंडळी थेट आपल्या गावी येत आहेत. गेल्या आठ दिवसांत पुणे आणि मुंबईतून शेकडो लोक सोलापुरात पोहोचले आहेत. आणखी बरेच लोक रेल्वे, एसटी, खासगी गाड्यांनी दाखल होत आहेत.
या लोकांची तपासणी होत नसल्याचे पाहायला मिळते. ग्रामीण भागात पुण्यातील आलेल्या लोकांनी आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन केले जाते. दवंडीही दिली जाते. पण शहरात याबद्दल जनजागृती होत नसल्याचे पाहायला मिळते.
मागच्या काही दिवसांत हुतात्मा एक्स्प्रेस रिकामी पुण्याला गेली. परत येताना मात्र या गाडीचे डबे भरलेले होते. एसटी स्टॅँडवरही बरेच लोक दाखल होतात. खासगी वाहनाने येणाºयांची संख्या वाढतच आहे. प्रशासनाने एसटी स्टॅँड आणि टोलनाक्यावर तपासणी नेमणे आवश्यक आहे.
- बाबा मिस्त्री,
नगरसेवक, कॉँग्रेस
मुंबई-पुण्यात साथीच्या आजारामुळे लोक आपल्या गावाकडे परतत आहेत. त्यांना रोखता येणार नाही. त्यांना गावाकडे येऊन स्वस्थ बसू द्या. संशयित रुग्ण आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाला कळवावे. रुग्णाने स्वत:हून सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे.
- मिलिंद शंभरकर,
जिल्हाधिकारी