-आप्पासाहेब पाटील, सोलापूर निर्दयी बापाने केलेल्या कृत्य समोर आल्यानंतर सोलापूर हळहळलं. एका बापाने पोटच्या ७ वर्षाच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर तिला घराशेजारच्याच खड्ड्यात पुरले. ते दिसून नये म्हणून त्याच्यावर व्यवस्थित माती टाकली. पण, प्रकरणाची वाच्यता झाली आणि जिल्ह्यात खळबळ उडाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका अल्पवयीन मुलीचा बापाने खून केला अन् पुरावा नष्ट करण्यासाठी घराजवळील एका खड्ड्यात तो पुरला. ही धक्कादायक घटना आहे सोलापूर जिल्ह्यात असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर गावातील.
नेमके काय घडले?
शुक्रवार (२३ मे) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पोलीस पाटील महानंदा विठ्ठल पाटील (वय ४२, कुसुर, ता. द. सोलापूर ) यांना सर्वात आधी या घटनेची माहिती मिळाली.
ओघसिद्ध कोठे याने त्याच्या ७ वर्षीय मुलीची हत्या केली आणि तिला पुरले आहे, असे कळल्यावर पाटील रेवणसिद्ध कोठे यांच्या वस्तीवर गेले. तेथे सरपंच रेवणसिद्ध कोठे यांचे पती मनोहर नरोटे, मदुरा खांडेकर हजर होते.
त्यानंतर ते ओघसिद्धी कोठे यांच्या घरी गेले. तिथे पत्राच्या घरासमोरील बांधकाम करण्यासाठी खांदलेल्या खड्ड्याजवळ पाहणी केली. त्यावेळी खोदकाम करून मातीने झाकलेले दिसून आले. त्यामुळे तक्रारदार पाटील आणि मनोहर नरोटे असे दोघांनी मंद्रुप पोलीस ठाणेचे पोलीस हवालदार मुलाणी यांना सर्व हकिकत सांगितली.
पोलीस आल्यानंतर समोर आले प्रकरण
त्यानंतर काही वेळाने मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कोठे यांच्या वस्तीवर आले. त्यानंतर दुपारी नायब तहसिलदार मंद्रुप जितेंद्र मोरे, वैद्यकीय अधिकारी भंडारकवठे रूषभ कांबळे, दोन पंच गावकामगार तलाठी कुसूर व कोतवाल, फोटोग्राफर, पोलीस स्टाफ व पोलीस तपासणी वाहन असे घटनास्थळावर आले.
त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून नायब तहसिलदार मंद्रुप यांनी वैद्यकीय अधिकारी व पंच यांच्या समक्ष व्हिडीओ शुटींग व फोटोग्राफी करून कुसूर गावातील सरपंच यांचे पती व इतर तिघे जण यांच्या मदतीने खोदकाम केले.
त्यावेळी ७ वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला. तिच्या अंगावर शाळेचा गणवेश होता. तिच्या अंगावर हलका पाऊस झाल्यामुळे माती चिकटलेली होती. मुलीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर ते मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालय मंद्रूप शवविच्छदेनासाठी आणले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.