भयंकर! व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल, IPS असल्याचं सांगून डिजिटल अरेस्ट अन् २७ लाख उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:59 IST2025-03-29T15:57:32+5:302025-03-29T15:59:01+5:30
दोघांना गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून अटक केली आहे.

भयंकर! व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल, IPS असल्याचं सांगून डिजिटल अरेस्ट अन् २७ लाख उकळले
Solapur Crime : सोलापूर शहरातील एका 'एमआर'ला (मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह) डिजिटल अरेस्ट करून त्याच्याकडून २७ लाख १० हजार रूपये ट्रान्स्फर्म करण्यास सांगून आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांना गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून अटक केली आहे.
धवलभाई विपूरभाई शहा आणि हार्दिक रोहितभाई शहा (दोघे रा. अहमदाबाद राज्य-गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. 'एमआर' घरी असताना त्यांना ८ नोव्हेंबर २०२४ रोजी ऑडिओ व व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्यांनी त्यांना स्वतःला आयपीएस अधिकारी व सीबीआय अधिकारी बोलतो असे सांगितले. तुमच्या नावाचे एक सीमकार्ड असून ते तुमच्या नावावर आहे. त्यावरून व्हॉटस अॅपद्वारे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल झालेले आहेत. याबाबत कुलाबा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे, तुम्हाला आमच्याकडून डिजीटल अॅरेस्ट झाली आहे, असे सांगितले.
याबाबत कोणाशी चर्चा करायची नाही असे सांगून अॅरेस्ट वॉरंट, सुप्रिम कोर्टाची नोटीस सर्व्हेलन्सचे ३ पानी इंग्रजीमध्ये नियम असलेली नोटीस व्हॉटस अॅपवर पाठवून दिली. आम्हाला विचारल्याशिवाय तुम्हाला कुठेही बाहेर जाता येणार नाही. तुमचा कॅमेरा सतत चालू राहिला पाहिजे असे सांगितले. आयपीएस आधिकारी असल्याचे सांगून विजय खन्ना नावाच्या व्यक्तीने 'एमआर' ची चौकशी केली. 'एमआर' यांना कॅनरा बँकेतील तुमच्या खात्यामधून रक्कम ट्रान्फर मनी लाँड्रिंगमध्ये झालेली आहे. तपास कामात सहकार्य करा म्हणून तुमची रक्कम नोटरी करून आम्हाला जमा करा. तपास पूर्ण झाल्यावर तुम्हाला ४८ तासांत परत करू, असे सांगून २७ लाख १० हजार रूपये ट्रान्फर करण्यास सांगितले व आर्थिक फसवणूक केली.
बंगळुरूमध्ये एकाला झाली होती अटक
डिजिटल अॅरेस्ट करून फसवणूक प्रकरणी यातील एकाला बंगळुरू (कर्नाटक) येथे अटक झाली होती, त्यानंतर त्याचा जामीनही झाला. त्याची माहिती सोलापूरच्या सायबर सेलला मिळाली. तपास करीत त्याला अहमदाबाद येथे जाऊन अटक केली, सोबत आणखी एकाला अटक केली, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी दिली.
अन्य तीन आरोपी दुबईला पळाले
या प्रकरणातील अन्य तीन आरोपी निष्पन्न झाले आहेत, त्यांची माहिती घेतली असता ते दुबई येथे परागंदा झाल्याचे समजते. लवकरच त्यांना अटक केले जाईल, असे सायबर सेलच्या वतीने सांगण्यात आले