गृहविभागाचा उपक्रम; सोलापुरात लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 11:01 AM2020-01-17T11:01:58+5:302020-01-17T11:03:18+5:30

गुन्ह्यातील पुराव्यांची तपासणी होणार सोलापुरात

Home Department Activities; Small judicial scientific laboratory in Solapur | गृहविभागाचा उपक्रम; सोलापुरात लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा

गृहविभागाचा उपक्रम; सोलापुरात लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा

Next
ठळक मुद्देगुन्ह्यातील पुरावे व व्हिसेरा प्रयोगशाळेत आल्यास अवघ्या आठ दिवसांत त्याचा अहवाल तयार होणारभविष्यात आणखी दोन विभाग सुरू करण्याचा मानस असून, त्यासाठी प्रशस्त अशी शासकीय जागा शोधण्याचे काम सुरू

सोलापूर : गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळावरील पुराव्यांवर रासायनिक विश्लेषण करून त्याचा अहवाल तत्काळ न्यायालयात सादर करण्यासाठी नवीन वर्षात सोलापुरात लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा सज्ज झाली आहे. गृहविभागाने महाराष्ट्रात पाच ठिकाणी अशा प्रयोगशाळा सुरू केल्या असून त्यात सोलापूरचा समावेश आहे. प्रयोगशाळेला शेजारचा उस्मानाबाद हा जिल्हा जोडण्यात आला असल्याची माहिती लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. नितीन चुटके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

सोलापुरात जुळे सोलापूर डी-मार्टजवळील नरसिंह नगर येथे ही प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) सुरू होत आहे. प्रयोगशाळेत उपसंचालक, सहायक संचालक, वरिष्ठ लिपिक, तीन टेक्निशियन आणि नऊ कर्मचारी असणार आहेत. प्रयोगशाळेत सध्या जीवशास्त्र व विषशास्त्र असे दोन विभाग आहेत. जीवशास्त्र विभागात खून, अत्याचार, विविध गुन्ह्यात कपड्यावर पडलेले रक्त, वीर्य, व्हिसेरा आदींची तपासणी होऊन त्याचे विश्लेषण केले जाणार आहे. विषशास्त्र विभागात शेतकरी आत्महत्या, विषप्राशन, दारूमध्ये विष घालून पाजले असेल, पोटातील पाणी, उलटी, रक्त याचे रासायनिक विश्लेषण केले होणार आहे. 

महाराष्ट्रात वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, अमरावती व नाशिक या आठ ठिकाणी आहेत. पूर्वी सोलापूर शहर व जिल्ह्यात गुन्हा घडल्यास घटनास्थळावरील पुरावे तपासण्यासाठी पुणे येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवले जात होते. प्रयोगशाळेचा अहवाल येण्यास २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागत होता. यामुळे न्यायालयात गुन्हेगारांवरील सुनावणीला वेळ लागत होता. गुन्ह्याचे वाढते प्रमाण व प्रयोगशाळेच्या अहवालासाठी लागणारा वेळ लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने राज्यात पाच नवीन लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे आणि सोलापूरचा समावेश आहे. 

भाडेतत्त्वावर घेतली खासगी इमारत

  • लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेसाठी पूर्वी पोलीस मुख्यालयातील इमारत निश्चित करण्यात आली होती. मात्र तेथील नूतनीकरण व अन्य कामासाठी लागणारा निधी पाहता गृहविभागाने सध्या भाडेतत्त्वावर कार्यालय घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रयोगशाळेचे सर्व काम पूर्ण झाले असून १७ जानेवारीला याचे उद्घाटन होणार आहे. 
  • आठ दिवसांत सुरू होणार कामकाज
  •  प्रयोगशाळेचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसात कामकाज सुरू होणार आहे. आवश्यक तो कर्मचारीवर्ग या ठिकाणी नेमण्यात आला असून, सोलापूर शहर, जिल्हा व उस्मानाबाद येथील गुन्ह्यात तपासकामी लागणारे पुरावे प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. 

आणखी दोन विभाग सुरू करण्याचा मानस : नितीन चुटके
महाराष्ट्रात असलेल्या मोठ्या आठ प्रयोगशाळेत एकूण ७ ते ८ विभाग आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या गुन्ह्यातील पुराव्यांवर कामकाज चालते. सोलापूर व उस्मानाबाद येथील बहुतांश गुन्हे हे प्रलंबित आहेत. खून अत्याचार, खुनाचा प्रयत्न, कपड्यावरील रक्ताचे डाग आदी प्रकारच्या पुराव्यांचा अहवाल येण्यास वेळ लागतो. त्यामुळे सध्या जीवशास्त्र व विषशास्त्र हे दोन विभाग सुरू करण्यात आले आहेत. यासाठी हेड स्पेस गॅस क्रोमॅटोग्राफ, युवी स्पेक्टो फोटोमीटर आदी इतर मशिनरी प्रयोगशाळेत बसवण्यात आल्या आहेत.

गुन्ह्यातील पुरावे व व्हिसेरा प्रयोगशाळेत आल्यास अवघ्या आठ दिवसांत त्याचा अहवाल तयार होणार असून, तो तत्काळ न्यायालयात सादर केला जाणार आहे. भविष्यात आणखी दोन विभाग सुरू करण्याचा मानस असून, त्यासाठी प्रशस्त अशी शासकीय जागा शोधण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. नितीन चुटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

Web Title: Home Department Activities; Small judicial scientific laboratory in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.