‘आई, मी आलोच’ म्हणणारा वीर परतणार, पण तिरंग्यात; कर्तव्याच्या रणांगणावर कात्राळचा वीर पुत्र अमर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:15 IST2025-11-19T14:13:46+5:302025-11-19T14:15:29+5:30
लग्नाला अवघी दोन वर्षे आणि कर्तव्याच्या नावावर प्राणार्पण

‘आई, मी आलोच’ म्हणणारा वीर परतणार, पण तिरंग्यात; कर्तव्याच्या रणांगणावर कात्राळचा वीर पुत्र अमर
मल्लिकार्जुन देशमुखे, लोकमत न्युज नेटवर्क, मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ गावचा बहाद्दर सुपुत्र बाबासाहेब अंकुश पांढरे भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत असताना डेहराडून येथे झालेल्या भीषण अपघातात शहीद झाले. या अचानक आलेल्या बातमीने कात्राळ गावावर शोककळा पसरली असून गावातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू दाटले आहेत.
८ वर्षांची कर्तव्यनिष्ठ सेवा… आणि अचानक निधन: बाबासाहेब पांढरे यांनी ८ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात प्रवेश करून देशसेवेची शपथ घेतली होती.
ते ६७१ ई एम ई बटालियन, मिसामारी – आसाम येथे नर्सिंग असिस्टंट म्हणून प्रेरणादायी कार्य करत होते. समर्पण, शिस्त आणि धैर्य हीच त्यांची ओळख. सैन्यदलातही ते अत्यंत आदरणीय होते.
अपघात इतका भीषण की जागीच मृत्यू: मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता, डेहराडून येथे ते आपले कर्तव्य बजावत असताना सैन्यदलाच्या दुचाकीवरून जात होते. अचानक मागून आलेल्या २७१ साठा बॅटरीच्या लष्करी वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की पांढरे यांचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी मिळताच त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा काळा ढग दाटून आला.
दोनच वर्षांपूर्वी झालेले लग्न… आणि अचानक उद्भवलेले दु:ख
फक्त दोन वर्षांपूर्वीच विवाह झालेले. आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केलेल्या या तरुण वीराचा असा अचानक अंत झाल्याने पत्नी, आई-वडील, भाऊ—संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. घरचा मोठा आधार गेल्याने कात्राळ ग्रामस्थांच्याही मनात हळहळ व्यक्त होत आहे.
पार्थिव पुण्यात; नंतर मुळगावी--- लष्करी सन्मानात अंत्यसंस्कार
शहीद बाबासाहेब पांढरे यांचे पार्थिव उद्या डेहराडूनहून पुणे येथे आणले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या मुळगावी कात्राळ येथे पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गावातील नागरिक, नातेवाईक आणि सैन्यातील सहकारी त्यांना अखेरचा सलाम देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कात्राळचा वीर इतिहासात कोरला गेला…
कर्तव्याला प्राणांपेक्षा मोठे मानणारा हा शूर मराठा जवान आता स्मृतीतच राहणार असला तरी त्याचे बलिदान कात्राळच नव्हे तर संपूर्ण मंगळवेढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाणार आहे.