लय भारी... विद्यार्थ्यांनीच उधळला गुलाल; अभ्यासिकेतील मार्गदर्शक बनला फौजदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 17:40 IST2023-07-07T17:39:10+5:302023-07-07T17:40:26+5:30
राघवेंद्र सलगर यांची आर्थिक स्थिती बेताची असून वडील नागनाथ यांचा टी व्ही रपेअरी चा व्यवसाय आहे तर आई घरकाम करतात

लय भारी... विद्यार्थ्यांनीच उधळला गुलाल; अभ्यासिकेतील मार्गदर्शक बनला फौजदार
यशवंत सादूल
सोलापूर : अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण घेत शास्त्र शाखेतून पदवी संपादन केलेले राघवेंद्र सलगर. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून फौजदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारीला लागले. दोनदा परीक्षा दिल्यानंतर दोन्ही वेळेस अवघ्या दोन मार्कानी संधी हुकली. त्यानंतर आलेल्या कोरोनोच्या संकटाने आशा मावळली. उपजीविकेचे साधन म्हणून रविवार पेठ येथे अभ्यासिका सुरू केले. तेथील मुलांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करीत होते. त्याच दरम्यान २०२१ -२२ मध्ये पुन्हा तिसऱ्यांदा फौजदार परीक्षा दिली.त्यामध्ये यशस्वी झाले.
दरम्यान, राघवेंद्र सलगर यांची आर्थिक स्थिती बेताची असून वडील नागनाथ यांचा टी व्ही रपेअरी चा व्यवसाय आहे तर आई घरकाम करतात.पदवी संपादन केल्यानंतर राघवेंद्र यांनी स्विकारलेली खाजगी नौकरी फौजदार होण्याच्या ध्येयाने सोडून दिली. आर्थिक दुर्बल गट कटुंबातील सदस्य असलेल्या राघवेंद्र यांनी खुल्या गटातून परीक्षा देत हे फौजदार परीक्षेत यश मिळवले. त्यांच्या यशाबद्दल अभ्यासिकेतील विद्यार्थी आणि मित्रमंडळींना अत्यांनंद झाला.त्यांनी राघवेंद्र यांचा फेटा शाल अर्पण करीत सत्कार केला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात चक्क मिरवणूक काढली. गुलाब पाकळ्यांचा वर्षाव झाला.गुलालाची मुक्त उधळण करण्यात आले.यावेळी सीए किशोर आदोने, शिवकुमार बागलकोटे , विवेकानंद तुपे, सिद्धाराम मोटे, गणेश मोरे, प्रेमकुमार मेंगजी, लक्ष्मीकांत आडम, अक्षय जगदाळे,नागेश शिंदे आदी उपस्थित होते.