Good News; दिवाळीनंतर सोलापूर-मुंबई "वंदे भारत" एक्स्प्रेस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2022 18:05 IST2022-07-27T18:05:44+5:302022-07-27T18:05:51+5:30

रेल्वेमंत्र्यांची माहिती - खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींचा पुढाकार

Good News; Solapur-Mumbai "Vande Bharat" express will run after Diwali | Good News; दिवाळीनंतर सोलापूर-मुंबई "वंदे भारत" एक्स्प्रेस धावणार

Good News; दिवाळीनंतर सोलापूर-मुंबई "वंदे भारत" एक्स्प्रेस धावणार

सोलापूर : सोलापूरच्या विकासासाठी बहुप्रतीक्षेत असलेली सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू करण्यात येईल. त्यासंबंधीचा निर्णय झाला असून, दिवाळीनंतर त्याला हिरवा सिग्नल दाखविण्यात येईल, अशी आशा रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याशी बोलताना व्यक्त केली.

मंगळवारी संसदेच्या रेल्वे मंत्रालयाच्या कक्षात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर एक थोडीशी बैठक झाली. यावेळी मुंबई - सोलापूर - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस देण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिली. यासह रेल्वे संदर्भातील अन्य मागण्यांबाबत चर्चा झाली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचीदेखील उपस्थिती होती.

रेल मंत्रालय द्वारा देशात विविध भागात २०२३ पर्यंत ७५ वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालय द्वारा घेण्यात आलेला आहे. सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी रेल्वेने जवळपास आठ तास लागतात. सोलापूर येथून मुंबई व पुण्याला दर दिवशी जवळपास ५ ते ७ हजार प्रवासी शिक्षण, व्यापार व इतर कामानिमित्त प्रवास करत असतात. मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू झाल्यास मुंबईहून पुण्यावरून सोलापूरला येणारे व सोलापूरहून वरील दोन्ही शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना हे अंतर निम्म्या वेळेत पार करता येणे शक्य होणार असून, त्यामुळे ही फार मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

---------

सोलापूर-द्वारकासाठीही प्रयत्न...

तसेच सोलापूर हे पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, हत्तरसंग कुडल, हैद्रासारख्या तीर्थस्थळांना दर्शनासाठी प्रतिवर्षी भारतातून लाखो भाविक येतात. त्यामुळे सोलापूर-द्वारका (गुजरात) नवीन रेल्वे सुरू व्हावी, जेणेकरून सोलापूरसह अन्य जिल्ह्यांतून भाविकांना गुजरातला जाणे सोपे होईल, अशीही मागणी प्रामुख्याने करण्यात आली.

---------

बंद किसान रेल्वे सेवा पुन्हा सुरू करा

याबरोबर सोलापुरातून जाणाऱ्या बसवा एक्स्प्रेसला अक्कलकोट रोड येथे प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात यावा. हुबळी-सोलापूर नवीन रेल्वे सुरू करणे. सोलापुरात सुरू असलेली किसान रेल्वे सेवा पुनर्स्थापित करणे, सोलापूर ते त्रिवेंद्रम दरम्यान नवी किसान रेल्वे सेवा सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली.

---------

Web Title: Good News; Solapur-Mumbai "Vande Bharat" express will run after Diwali