अपार्टमेंटमधील सदस्यांनी पार्किंगच्या मोकळ्या जागेत शेकडो रोपांची फुलविली बाग...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 15:22 IST2020-04-30T15:20:03+5:302020-04-30T15:22:23+5:30
लॉकडाऊनचा असाही उपयोग; ड्रीप अन् स्प्रिंकलरचा वापर, तीनशेपेक्षाही अधिक झाडे

अपार्टमेंटमधील सदस्यांनी पार्किंगच्या मोकळ्या जागेत शेकडो रोपांची फुलविली बाग...!
सोलापूर : सव्वा महिन्याच्या लॉकडाऊन काळात एका अपार्टमेंटमधील सदस्यांनी पार्किंगच्या मोकळ्या जागेत शेकडो रोपांची बाग फुलविली. यासाठी स्प्रिंकलर आणि ड्रीपचाही वापर केला.
सोलापूरच्या अंत्रोळीकर नगर परिसरातील हरेश्वर रेसिडेन्सी येथे २२ मार्चपासून सारे सदस्य घरातच आहेत. या अपार्टमेंटमधील पार्किंग लगतची मोकळी जागा पूर्वीपासूनच हिरवळीसाठी राखून ठेवण्यात आली होती. येथील वृक्षप्रेमी आदिल मुन्शी याठिकाणी हिरवाई निर्माण करण्यासाठी पूर्वीपासूनच खूप कष्ट घेत होते. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात इतर सदस्यांनी त्यांना मनापासून साथ दिली. वापरलेल्या जुन्या प्लास्टिकच्या बादल्या आणि टायर यांचाही वापर करण्यात आला. याठिकाणी तीनशे पेक्षाही जास्त विविध रोपे लावण्यात आली.
या नैसर्गिक उपक्रमासाठी संजय सुरवसे, ए. बी. पाटील, रुपेश दिकोंडा, राजन चिंचोरे आणि पवन घोडके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
एकजुटीतून फुलली बाग
- कॉलनी अथवा बंगल्याच्या परिसरात प्रशस्त जागा असल्याने येथे मनाप्रमाणे बाग फुलवता येते. अपार्टमेंटमध्ये आपापल्या बाल्कनीमध्ये कुंड्यांमध्ये रोपं लावून बागेची हौस भागवावी लागते. मात्र हरेश्वर रेसीडन्सीमधील २२ जणांनी एकत्रित येऊन सामूहिकपणे हिरवळ फुलवण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला. त्यांच्या एकजुटीमुळेच ही बाग मूर्त स्वरुपात आली आहे.