भरल्या नदीतून अंत्यसंस्कारासाठी जाताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:25 AM2021-09-21T04:25:15+5:302021-09-21T04:25:15+5:30

नातलगांच्या जिवाचीही होतेय घालमेल लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : हरणा नदीला पूर आला तर मृताच्या नातेवाइकांना चिंता असते त्याच्या ...

Going for a funeral across a flooded river | भरल्या नदीतून अंत्यसंस्कारासाठी जाताना

भरल्या नदीतून अंत्यसंस्कारासाठी जाताना

Next

नातलगांच्या जिवाचीही होतेय घालमेल

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : हरणा नदीला पूर आला तर मृताच्या नातेवाइकांना चिंता असते त्याच्या अंत्यसंस्काराची. ही व्यथा आहे शेती, शिक्षण आणि सर्वार्थाने प्रगती साधलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रगतिपथावर असलेल्या मुस्ती गावच्या ग्रामस्थांची.

हरणा नदीच्या काठावर वसलेले मुस्ती गाव. या नदीने गावाला समृद्धीच्या वाटेने नेले. शेत-शिवार हिरवेगार झाले. शेतीच्या क्षेत्रात मुस्तीचे नाव सातासमुद्रापार गेले. गावाच्या सर्वांगीण विकासात हरणा नदीच्या अस्तित्वाने मोठे योगदान दिले. याच नदीने जगण्यासाठी कित्येक पिढ्याना बळ दिले. मात्र मरणानंतर यातनांचा अडथळाही निर्माण केला. मृताच्या अंत्यसंस्काराची शेकडो वर्षांची चिंता कायम राहिली. प्रगतीच्या वाटेवर जाताना हीच हरणा नदी अधोगतीला कारणीभूत असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत असतात.

गावाच्या बाहेर हरणा नदीच्या पल्याड स्मशानभूमी आहे. पावसाळ्यात हरणा नदीला सातत्याने पूर येतो. एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नातलगांना दुःखाबरोबर अंत्यसंस्काराच्या चिंतेने ग्रासले जाते. नदीतून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताच बंद होतो. त्यामुळे अनेकदा स्मशानभूमीऐवजी मिळेल त्या जागेत अंत्यविधी उरकण्याची दुर्दैवी वेळ नातलगावर येऊन ठेपते. गावाने भौतिक प्रगती साधली मात्र हरणा नदीवरचा पूल काही उभारता आला नाही याची खंत ग्रामस्थांना सतत बोचत असते.

-------

चार महिने शेती बेभरवशाची

पावसाळ्यात हरणा नदी दुतर्फा भरून वाहते. या काळात शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. पूर ओसरेपर्यंत भुकेल्या जनावरांची आणि शेतीची चिंता त्यांना सतावत असते. हरणा नदीवर पूल नसल्याने शेती बेभरवशाची बनली आहे. त्याचाच फटका शेतीला बसला. द्राक्षे, पपई, केळी या पिकात प्रगती साधलेल्या शेतकऱ्यांनी बेभरवशाच्या शेतीमुळे नगदी पिकांचा नाद सोडून दिला आणि उसाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

------

स्मशानभूमीचीही होतेय नेहमीच दुरवस्था

नदीपात्रालगत स्मशानभूमी असल्याने तिचा विकास करता येत नाही. त्यासाठी आतापर्यंत अनेकदा केलेला खर्च वाया गेला. भरपावसात अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ नातलगावर येते. हिंदूंची स्मशानभूमी या अवस्थेत आहे तर त्याच्यापुढे अर्ध्या किमीवर मुस्लीम स्मशानभूमी आहे. नदीवर पूल नसल्याने दोन्ही समाजाची अडचण होते. त्यासाठी पर्यायी जागाही नाही.

----

अनेक वर्षांपासून हरणा नदीवर पूल बांधण्याची आमची मागणी आहे. राजकारणात आम्हाला मोठी पदं मिळाली असली तरी या नदीवरचा पूल उभारण्यात अद्याप यश आले नाही. जून महिन्यात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना त्यासाठी साकडे घातले आहे.

- भीमाशंकर जमादार

माजी सभापती

Web Title: Going for a funeral across a flooded river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.