Ganpatrao Deshmukh : गणपतराव देशमुखांच्या नावाने शासकीय योजना, पालकमंत्र्यांची सोलापुरात घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 18:22 IST2021-07-31T18:13:47+5:302021-07-31T18:22:29+5:30
Ganpatrao Deshmukh : तरुण पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, आदर्श रहावा म्हणून राज्य शासन गणपतराव देशमुख यांच्या नावाने शासकीय योजना सुरू करेल, अशी घोषणा भरणे यांनी केली.

Ganpatrao Deshmukh : गणपतराव देशमुखांच्या नावाने शासकीय योजना, पालकमंत्र्यांची सोलापुरात घोषणा
सोलापूर - सांगोल्याचे माजी आमदार, माजी मंत्री, शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी येथील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेंसह आमदार, खासदार अन् दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. येथील शोकसभेत बोलताना, गणपतराव देशमुख यांच्या नावाने राज्य सरकार शासकीय योजना सुरू करेल, अशी घोषणाच पालकमंत्र्यांनी केली.
पालकमंत्री भरणे यांनी बोलताना सांगितले की, गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यासह, राज्याचे नुकसान झाले आहे. सर्वसामान्य नेते आणि सामान्यांचे नेते, अशी ओळख त्यांची होती. तरुण पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, आदर्श रहावा म्हणून राज्य शासन गणपतराव देशमुख यांच्या नावाने शासकीय योजना सुरू करेल, अशी घोषणा भरणे यांनी केली.
तब्बल ११ वेळा विधानसभेत जनतेचे प्रतिनिधित्व करणारे लोकनेते माजी मंत्री गणपतराव (आबा) देशमुख यांच्या सांगोला या गावी जाऊन स्व. आबांच्या पार्थिवदेहास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले. pic.twitter.com/HPKfu9VUKh
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) July 31, 2021
गणपतरावांचे जेष्ठ सुपूत्र पोपट देशमुख, चंद्रकांत देशमुख, नातू डॉ बाबासाहेब आणि अनिकेत देशमुख यांनी गणपतराव देशमुख यांच्या मृतदेहाला भडाग्नी दिला. त्यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांना पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज देण्यात आला. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील, अनिल बाबर, शेकापचे जयंत पाटील, प्रशांत परिचारक, आमदार सुमनताई पाटील, अनिल बाबर, अण्णा डांगे, रामहरी रुपनवर, दीपक साळुंखे-पाटील, प्रकाश शेंडगे, नारायण पाटील, वाळव्याचे वैभव नाईकवडी, बाबा कारंडे यांनी गणपतराव देशमुख यांच्याबद्दल शोक भावना व्यक्त केल्या.