बनावट दस्ताद्वारे मालकाच्या परस्पर विकला तिऱ्हाईताला प्लॉट, साक्षीदारासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By विलास जळकोटकर | Updated: August 19, 2023 22:07 IST2023-08-19T22:07:06+5:302023-08-19T22:07:44+5:30
Solapur: मूळ मालकाला खबर न लागू देता बनावट दस्त तयार करुन जागेच्या मूळ मालकानेच आसरा चौक परिसरातील प्लॉट विक्रीला दिल्याचा बनाव केला. सन २००४ ते २०२० या दरम्यान ही घटना घडली आहे.

बनावट दस्ताद्वारे मालकाच्या परस्पर विकला तिऱ्हाईताला प्लॉट, साक्षीदारासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
- विलास जळकोटकर
सोलापूर - मूळ मालकाला खबर न लागू देता बनावट दस्त तयार करुन जागेच्या मूळ मालकानेच आसरा चौक परिसरातील प्लॉट विक्रीला दिल्याचा बनाव केला. सन २००४ ते २०२० या दरम्यान ही घटना घडली आहे. याप्रकरणी साक्षीदारासह तिघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
पोलीस सूत्रांनुसार फिर्यादी सज्जन विनायक कांबळे (वय ४९, रा. बुधवार पेठ, जय मल्हार चौक) यांनी किशोर चंडक यांच्याकडून ५ मार्च २००२ रोजी मंत्री चंडक इस्टेट मधील प्लॉट नंबर ११७ रितसर खरेदी केला हता. त्यानंतर हा प्लॉट यातील फिर्यादी यांनी कोणासही विक्री केला नाही. परंतु फिर्यादी यांनी खरेदी केल्याच्या १६ वर्षानंतर प्लॉटच्या फेर उताऱ्यावर संशयित व्यक्तीच्या नावाची नोंद करण्यात आली. त्यासाठी अनोंदणीकृत बनावट कागदपत्रे आरोपींकडून तयार करण्यात आली.
दरम्यान आरोपी इस्माईल याने बनावट कागदपत्रांचा वापर करून बेकायदेशीर व्यवहार करून यातील फिर्यादी सज्जन व शासनाची फसवणूक केली आहे. या व्यवहारास चंद्रकांत सिद्राम कांबळे व अब्बास अ.हमीद शेख हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. त्यांच्याविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक क्षिरसागर हे तपास करीत आहेत.
अशीही बनवाबनवी
विशेष म्हणजे २००४ मध्ये यातील फिर्यादी सज्जन कांबळे यानेच आरोपी ईस्माईल ईब्राहिम शेख (रा. इंदिरा नगर, विजापूर रोड) यास खरेदी दिल्याचे या कागदपत्रात दाखविण्यात आले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपी ईस्माईल याने उताऱ्यावर स्वत:च्या नावाची नोंद करून घेऊन जहीर मुल्ला या व्यक्तीला तो प्लॉट विक्री केला. त्यानंतर जहीर मुल्ला यानेही महमद युसूफ याकुबअली उस्ताद यांना तो प्लॉट खरेदी दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे.