मंगळवेढ्यातील दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चरणूकाका पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 10:30 IST2020-08-27T07:02:51+5:302020-08-27T10:30:11+5:30
मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

मंगळवेढ्यातील दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चरणूकाका पाटील यांचे निधन
मंगळवेढा : मंगळवेढा येथील श्री संत दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चरणूकाका पाटील यांचे गुरुवारी रात्री २ वाजता सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.
ब्रह्मपुरी येथील शेतकरी कुटुंबातील चरणूकाका पाटील यांनी भीमा साखर कारखानाची १५ वर्ष यशस्वीपणे धुरा सांभाळली. भीमा नदी काठी ऊसाचे मोठे क्षेत्र पाहता व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप होऊन त्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांनी तालुक्यात दामाजी साखर कारखाना उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले.
तालुक्यातील जेष्ठ नेते माजी आमदार किसनलाल मर्दा व रतनचंद शहा या दोन जेष्ठ नेत्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्रित आणून दामाजी साखर उभारणीसाठी महत्वाचा दुवा साधला. त्यांनी संचालकपद, व्हा चेअरमन, चेअरमन ही सर्व पदे यशस्वीपणे सांभाळली त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकरी व कामगार केंद्रबिंदू मानून कारखान्याचा कारभार पहिला. शेतकऱ्यांप्रति त्याची खूप आस्था होती. ब्रह्मपुरी गावास तालुक्याचे सत्ता केंद्र म्हणून नावारूपाला आणले होते ते गेल्या महिन्यांपासून किडनीच्या आजारासाठी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते, गुरुवारी रात्री दोन वाजता त्याची प्राणज्योत मालवली, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विविहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर सोलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.