बाप रे; गॅस सिलिंडर डोक्यात घालून मुलाने केला आईचा खून; सोलापुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 18:33 IST2021-05-04T18:33:35+5:302021-05-04T18:33:41+5:30

जाळण्याचाही केला प्रयत्न ; मुलगा पोलिसांच्या ताब्यात

Father Ray; Mother kills mother with gas cylinder in head; Incident in Solapur | बाप रे; गॅस सिलिंडर डोक्यात घालून मुलाने केला आईचा खून; सोलापुरातील घटना

बाप रे; गॅस सिलिंडर डोक्यात घालून मुलाने केला आईचा खून; सोलापुरातील घटना

सोलापूर : घरगुती कारणातून दारूच्या नशेत मुलाने आईच्या डोक्यात गॅस सिलिंडर घालून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना संजय गांधी नगरातील दोन नंबर झोपडपट्टी येथे घडली. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. शरणव्वा दत्ताप्पा गोळसर (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सिद्धाराम दत्तप्पा गोळसर (वय ३२) या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या तीन ते चार दिवसांपासून संशयित आरोपी सिद्धाराम गोळसर हा आपल्या आईशी दारू पिऊन वाद घालत होता. गेल्या तीन दिवसांपासून सारखे भांडण सुरू होते. सोमवारी दुपारी सिद्धाराम याने आईच्या डोक्यात सिलिंडर घातले. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी आरोपी हा घटनास्थळी उपस्थित होता. पोलिसांनी त्याची विचारपूस केली. यावेळी नशेमध्ये तो पोलिसांनाही उलट उत्तरे देत होता. तुम्ही कोणीही माझ्या आईच्या मृतदेहाला हात लावू नका. इथून तिला घेऊन जाऊ नका असे म्हणत आरडाओरड करत होता. अंत्यसंस्कार आम्ही सर्व बांधव मिळून करू असे तो म्हणत होता.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि विच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, साहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, डॉ. प्रीती टिपरे, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत पवार, गुन्हे शाखेचे प्रभारी सुनील दोरगे यांनी घटनास्थळी पाहणी केली.

हातावर जाळलेले डाग

मृतदेहाच्या दोन्ही हाताच्या कोपरावर जाळलेले डाग दिसून येत होते. सोबतच पायावरही जळालेले निशाण होते. डोळ्यांवर मार बसल्यामुळे डोळे काळेनिळे झाले होते. यामुळे डोळ्यांना सूज आल्याचे दिसून येत होते. सोबतच घरात एका बाजूस सिलिंडरची टाकी आडवी पडली होती. तसेच एक पांढऱ्या रंगाचा शर्ट अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता व घरातील कुलर आडवा पडला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Father Ray; Mother kills mother with gas cylinder in head; Incident in Solapur