Farmers in Solapur have thanked Chief Minister Uddhav Thackeray for his help | मदतीचं आश्वासन अन् धनादेश दिल्यानंतर आम्ही समाधानी; ग्रामस्थांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार

मदतीचं आश्वासन अन् धनादेश दिल्यानंतर आम्ही समाधानी; ग्रामस्थांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार

सोलापूर: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल. त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले आहे.  विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली. सोलापूरमधील नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करताना उद्धव ठाकरेंनी हे आश्वासन दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, पावसाळा सुरुवात झाल्यापासून मी सातत्याने संपर्कात आहे, नुकसान किती होतेय, पावसाचा अंदाज याची माहिती घेत होतो, टार्गेट दिल्यासारखं पाऊस सगळीकडे पडतोय. शेतकरी आणि आपत्तीग्रस्त हे संकटाच्या डोंगराखाली अडकलेले आहेत. त्या लोकांना दिलासा आणि धीर देण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. सरकारकडून जे जे काही करणे आवश्यक आहे ते लोकांसाठी आम्ही करू, हे सरकार तुमचं आहे. परतीचा पाऊस आणखी किती दिवस चालेल, त्याचा फटका कितपत बसेल याचा अंदाज आला आहे. दुर्दैवाने ज्यांच्या घरातील माणसं दगावली त्यांना काही दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, असं उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.

उद्धव ठाकरेंनी काही शेतकऱ्यांना मदतीचा धनादेश देखील यावेळी दिला. उद्धव ठाकरेंच्या या पाहणी दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना देखील समाधान वाटल्याचे सोलापूरमधील काही शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. उद्धव ठाकरेंनी मदतीचं आश्वासन दिलं आहे. तसेच काही शेतकऱ्यांना धनादेश देखील दिला आहे. पाहणीसाठी मुख्यमंत्री आले बरं वाटलं, पण आता लवकरात लवकर गावाचं पुनर्वसन व्हावं, अशी मागणी सोलापूरमधील गावकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी चर्चा केली.  तसेच या भागात 150 घरांचे अतोनात नुकसान झालेल्या नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात मदत म्हणून धनादेशांचे देखील वाटप केले. आज सोलापूर जिल्ह्याचा पूरग्रस्त भागांचा दौरा पुर्ण केल्यावर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरग्रस्त  भागाचा दौरा करणार आहेत.

Web Title: Farmers in Solapur have thanked Chief Minister Uddhav Thackeray for his help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.