उधारी झाली तरी लालपरीचे सेवेकरी आनंदाने दिवाळी साजरी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 07:29 PM2021-11-02T19:29:01+5:302021-11-02T19:29:09+5:30

कर्जाऊ घेतली रक्कम; वेतनाची अद्याप प्रतीक्षा, मित्रांकडून झाली मदत

Even if borrowed, Lalpari's servants will celebrate Diwali with joy | उधारी झाली तरी लालपरीचे सेवेकरी आनंदाने दिवाळी साजरी करणार

उधारी झाली तरी लालपरीचे सेवेकरी आनंदाने दिवाळी साजरी करणार

Next

सोलापूर : प्रवाशांच्या अविरत सेवेत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वेतन अन् भत्त्यांपासून वंचित राहावे लागले आहे; पण दिवाळी हा वर्षातील मोठा अन् आनंदाचा सण साजरा तरी करावा लागेलच ना! आपल्यासाठी नाही निदान मुला - बाळांसाठी तर प्रकाशाचं हे पर्व साजरं करावं लागणारच आहे. त्यामुळे वेतन नसले तरी उधार - उसनवारी करून, काही रक्कम कर्जाऊ घेऊन लालपरीच्या या सेवेकऱ्यांनी दिवाळी साजरी करण्याची तयारी केली आहे.

मागील अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांवर वेतनाअभावी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळीसारख्या मोठ्या सणावेळीही अशा अडचणी येत असल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी ही उसनवारी घेऊनच करावी लागत आहे. कर्मचाऱ्यांना लवकरच भत्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पण, अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर कोणतीही रक्कम प्राप्त न झाल्याने नाइलाजाने कर्मचारी उसनवारी करत आहेत. यातूनच छोट्या प्रमाणात का होईना कर्मचाऱ्यांकडून आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून दिवाळीचा आनंद साजरा केला जात आहे.

 

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नुकतेच आंदोलन उभे केले होते. यामुळे अनेक प्रवाशांची दैना झाली होती. यामुळे प्रशासन मध्यस्थी करत कर्मचाऱ्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. पण, मागण्या मान्य न झाल्याने काही संघटनांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा सुरू ठेवला. यामुळे काही ठिकाणी एसटी गाड्या आत्तापर्यंत सुरळीत झालेल्या नाहीत.

 

कोट

कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या काही प्रमाणात मान्य झाल्याने कृती समितीने आंदोलन मागे घेतले आहे. यामुळे प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार पूर्तता कधीपर्यंत होते. याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे. पण तरीही सध्या दिवाळीसारखा मोठा सण असल्याने कर्मचारी हे एकमेकांकडून उसने घेऊनच सण साजरा करत आहेत. काही सावकारांनी व्याजदर वाढवल्याचेही कानावर पडत आहे.

- मनोज मुदलियार, कृती समिती सदस्य

सावकारी टक्केवारीत वाढ

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन नसल्याने या कर्मचाऱ्यांना मोठी अडचण येत आहे. पण, ही संधी साधत अनेक सावकारांनी दिवाळीच्या वेळेस टक्केवारीच्या दरात वाढ केली आहे. यामुळे कर्मचारी खासगी सावकारांकडे न जाता आपल्या ओळखीपाळखीच्या नातेवाइकांकडून उसनवारी घेण्याकडे भर देत आहेत, अशी माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली.

Web Title: Even if borrowed, Lalpari's servants will celebrate Diwali with joy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.