मंत्रिमंडळ, खाते वाटपाचा गाेंधळ पाहता एकनाथ शिंदेंनाही वैताग आला असेल, जयंत पाटलांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 21:36 IST2022-08-12T21:35:13+5:302022-08-12T21:36:36+5:30
Jayant Patil: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील 18 मंत्र्यांचा शपथविधी हाेउन तीन दिवस झाले तरी खाते वाटप झाले नाही. यावरुन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना खाेचक टाेला लगावला.

मंत्रिमंडळ, खाते वाटपाचा गाेंधळ पाहता एकनाथ शिंदेंनाही वैताग आला असेल, जयंत पाटलांचा खोचक टोला
- राकेश कदम
साेलापूर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील 18 मंत्र्यांचा शपथविधी हाेउन तीन दिवस झाले तरी खाते वाटप झाले नाही. यावरुन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना खाेचक टाेला लगावला. मुख्यमंत्री शपथ घेणे साेपे आहे पण साेबत आलेल्या लाेकांना मंत्री करणे अवघड आहे. मंत्री केल्यानंतर खाते वाटप आणखी किती अवघड आहे हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले आहे. या सर्व गाेष्टी पाहून मी नगरविकास मंत्री हाेताे तेच बरे हाेते. उगाच कशाला वैताग करून घेतला अशी त्यांची मानसिकता झाली असेल, असे पाटील म्हणाले.
महापालिकेतील एमआयएमच्या सहा नगरसेविकांनी शुक्रवारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात जयंत पाटील म्हणाले, सरळ चांगले चाललेले सरकार पाडण्याचे काम भाजपने केले. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी कुठेही हलली नाही. उध्दव ठाकरे यांनी ज्यांना माेठे केले ते जवळचे लाेक साेडून गेल्याने ही परिस्थिती ओढवली. मी नांदेड, परभणी इतर जिल्ह्यांचा दाैरा केला. या दाैऱ्यात मला शिवसेनेचा स्थानिक कार्यकर्ता कुठेही हललेला नसल्याचे दिसून आले. जिल्ह्याचा नेता हलला असेल पण कार्यकर्ता पक्षात आहे. खासदार, आमदार साेडून गेले तरी शिवसेना पक्ष ज्यांना उमेदवारी देताे ताेच उमेदवार निवडून येताे ही त्या पक्षाीच परंपरा आहे. ज्यांनी पक्ष साेडून पलायन केले. त्या पुन्हा जनतेत किती स्थान मिळेल याची शंका आहे.