पालकमंत्र्यांच्या गाडीवर घाण

By admin | Published: June 18, 2014 12:57 AM2014-06-18T00:57:10+5:302014-06-18T00:57:10+5:30

सात जणांना अटक: भाविकांना सोयीसुविधा मिळत नसल्याने सेनेकडून निषेध

Dump on Guardian car | पालकमंत्र्यांच्या गाडीवर घाण

पालकमंत्र्यांच्या गाडीवर घाण

Next

पंढरपूर : पंढरपूर तीर्थक्षेत्र असले तरी येथील घाण, दुर्गंधी काही केल्या संपुष्टात येत नाही. याबाबत तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने संतप्त झालेल्या शिवसेना शहरप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री तथा पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या गाडीवर गटारीतील घाण ओतून निषेध व्यक्त केला. दरम्यान पालकमंत्र्यांनीही या माध्यमातून कार्यकर्त्यांनी राग व्यक्त केल्याचे स्पष्ट करीत अस्वच्छतेबाबत दुजोराच दिला आहे. या प्रकरणी सात जणांना अटक झाली आहे.
९ जुलै रोजी होत असलेल्या आषाढी यात्रेच्या बैठकीसाठी मंगळवारी पालकमंत्री सोपल पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. आषाढीच्या बैठकीत पालकमंत्र्यांसह अधिकारी व्यस्त असताना शिवसेनेचे शहरप्रमुख संदीप केंदळे यांच्यासह बाळासाहेब देवकर, नितीन थिटे, युवराज घोडेवाडेकर, नवनाथ चव्हाण, विशाल पोकळे, दत्ता पाटील यांच्यासह पालकमंत्र्यांच्या गाडीवर गटारीतील घाण ओतून राग व्यक्त केला. आषाढी, कार्तिकी अन्य यात्रेच्या कालावधीमध्ये लाखो भाविक पंढरीत हजेरी लावतात. या काळात भाविकांना आवश्यक त्या सुविधा दिल्या जात नाहीत, शिवाय त्यांच्या स्वच्छतेचीही काळजी घेतली जात नाही. यामुळे राहुट्या, तंबू टाकून राहिलेल्या ठिकाणी घाण तशीच राहिल्याने दुर्गंधी सुटते. सर्वात कहर म्हणजे चंद्रभागा वाळवंटात पुरेशा शौचालयाची सुविधा नसल्याने भाविक उघड्यावरच शौचविधी उरकतात. यात वाळवंटामध्ये प्रचंड गर्दी असल्याने स्वच्छता करण्यात व्यत्ययही येतो. यामुळे यात्रेच्या कालावधीत पाच ते सहा दिवस दुर्गंधी पसरते. पण यावर काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. यामुळे भाविकांबरोबरच कायमस्वरूपी राहणाऱ्या शहरवासीयांनाही त्रास सहन करावा लागतो.
यातून सुटका होण्यासाठी पंढरपूरला शासनाने तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करून प्राधिकरणाच्या माध्यमातून १४६ कोटी रूपये मंजूर केले. याच माध्यमातून शहरात रस्ते, दिवाबत्ती, शौचालये, ड्रेनेज व विशेष करून स्वच्छतेवर कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आल्याचे पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सांगितले़ दरम्यान संदीप केंदळे यांनी कोट्यवधी रूपये खर्च करूनही समस्या दूर होत नसतील तर त्याचा काय उपयोग आणि आरोग्याचा प्रश्न नेहमीच का भेडसावतो, असा सवाल उपस्थित केला. याबाबत पालकमंत्र्यांसह विभागीय आयुक्तांना उत्तर देता न आल्याने केंदळे यांच्यासह सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून बाहेर पडत त्यांच्या गाडीवर गटारीतील घाण ओतून शासन व प्रशासकीय कारभाराचा रोष व्यक्त केला.
--------------------------------
सेनेच्या कार्यकर्त्यांनी पंढरीतील अस्वच्छतेबाबत त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या भावनेचा सकारात्मक विचार करून यापुढील काळात पंढरीत येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्न करेल.
- दिलीप सोपल
स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री

Web Title: Dump on Guardian car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.