'डॉ. शिरीष वळसंगकर यांना आयुष्य संपवण्यापूर्वी 'पी राऊत' नावाच्या महिलेचे दहा कॉल', कोर्टात काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 09:59 IST2025-12-11T09:58:10+5:302025-12-11T09:59:50+5:30
Dr Shirish Valsangkar: राज्यभर गाजलेल्या सोलापूरमधील डॉ. शिरीष वळसगकर आत्महत्या प्रकरणाची सुनावणी सुरू असून, मनिषा मुसळे यांच्या वकिलाने धक्कादायक दावा न्यायालयात केला.

'डॉ. शिरीष वळसंगकर यांना आयुष्य संपवण्यापूर्वी 'पी राऊत' नावाच्या महिलेचे दहा कॉल', कोर्टात काय घडलं?
Dr Shirish Valsangkar Latest News: सोलापूरमधील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या मनिषा मुसळे यांच्या वकिलांनी न्यायालयात नवा दावा केला आहे. १८ एप्रिल २०२५ रोजी वळसंगकर यांनी आत्महत्या केली. वळसंगकर यांनी आयुष्य संपवण्याआधीपर्यंत पी राऊत नावाच्या महिलेचे त्यांना अनेक कॉल आले होते, असे वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर सीडीआर, टॉवर लोकेशन सादर करा असे आदेश न्यायाधीशांनी पोलिसांना दिले.
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील तपासात महत्त्वपूर्ण तांत्रिक पुरावे उजेडात आणण्यासाठी संबंधित मोबाईल कंपन्यांना डॉ. वळसंगकर तसेच इतर सहा व्यक्तींचे विस्तृत सीडीआर आणि टॉवर लोकेशन न्यायालयात सादर करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी दिले.
चार दिवसांचाच सीडीआर आणि लोकेशन
१८ एप्रिल २०२५ रोजी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी मनिषा मुसळे यांना अटक करण्यात आली होती. पुढे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. मात्र, दोषारोपपत्राचा तपशील अभ्यासगतांना तपास अधिकाऱ्यांनी डॉ. शिरीष आणि काही साक्षीदारांचा फक्त चार दिवसांचा सीडीआर आणि टॉवर लोकेशन नोंदविला असल्याचे दिसून आले.
दोघांमधील संभाषणाचा कालावधी मोठा
आत्महत्येपूर्वी डॉ. शिरीष यांनी साक्षीदार पी. राऊत यांच्याशी तीनवेळा संपर्क साधला होता, तसेच १६ ते १८ एप्रिलदरम्यान एका मोबाईल नंबरवर त्यांनी तब्बल दहावेळा संभाषण केले होते. या संभाषणाचा कालावधी मोठा होता, यामुळे त्या व्यक्तीची ओळख, त्या दिवसांत तो कुठे होता आणि त्या संवादांचे कारण तपासासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे मनिषा मुसळे यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयासमोर मांडले.
या पार्श्वभूमीवर मनीषा मुसळे यांच्या वतीने अॅड. प्रशांत नवगिरे यांनी अर्ज दाखल करून डॉ. वळसंगकर तसेच संबंधित सात जणांचे पाच महिन्यांचे सीडीआर आणि टॉवर लोकेशन नोंदी अभिलेखावर घेण्याची मागणी केली.
पी राऊत या वळसंगकर आत्महत्या प्रकरणात साक्षीदार आहेत. त्या वळसंगकर रुग्णालयात कर्मचारी आहेत.
१६ एप्रिल रोजी वळसंगकरांना जे कॉल आले, ते १ ते २ मिनिटांचे आहेत. १६ एप्रिल रोजी आर राऊत यांचा कॉल होता. एक कॉल ५७७ सेकंद, दुसरा ७४४ सेकंद, १२१ सेकंद आणि २७७ सेकंदाचा होता. १७ एप्रिल रोजी पुन्हा कॉल आले. १४२६ सेकंद, २२८ सेकंद, ६७ सेकंद असे तीन कॉल वळसंगकर यांना आले. इतके कॉल करण्याची वेळ या महिला कर्मचाऱ्याला का पडली, असा प्रश्न मनिषा मुसळे यांच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित केला.
सरकारी पक्षाने घेतली हरकत
या खटल्यात सरकारी पक्षाने अर्जास हरकत घेतली. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या म्हणण्यानुसार दहा कॉल झालेला मोबाईल नंबर आर. राऊत यांचाच असल्याचे नमूद करण्यात आले.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून आणि सादर केलेल्या नोंदींचा विचार करून न्यायालयाने डिसेंबर २०२४ ते मे २०२५ या कालावधीतील सातही व्यक्तींचे सीडीआर व टॉवर लोकेशन १७ जानेवारी २०२६ पूर्वी न्यायालयात सादर करण्याचा आदेश संबंधित मोबाईल कंपन्यांच्या नोडल अधिकाऱ्यांना दिला.