सोलापूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या १३४८ सदनिका तयार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 21:48 IST2025-08-15T21:47:00+5:302025-08-15T21:48:30+5:30
सोलापूर जिल्ह्यातील राबविण्यात येणारा हा प्रकल्प म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगारांकरिता हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करणारा प्रकल्प ठरतो.

सोलापूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या १३४८ सदनिका तयार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरण
सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे आणि शेळगी येथे उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील एकूण १३४८ लाभार्थ्यांना सदनिकांचे वितरण राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार, १७ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता उत्तर सोलापूरमधील राष्ट्रतेज अटल गृहप्रकल्प, गट क्र ९२/२, दहिटणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
देशातील प्रत्येक बेघर कुटुंबाला हक्काचा निवारा मिळवून देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे या उद्दिष्टावर आधारित केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सदनिका वितरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच मा. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, पुणे मंडळाचे मा. सभापती शिवाजीराव आढळराव पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेतील सार्वजनिक–खाजगी भागीदारी मध्ये परवडणार्या दरातील गृह बांधणी या घटकांतर्गत असंघटित कामगारांसाठी सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये ५० इमारतींतून ३२७ चौ फुटांच्या १२०० स्वयंपूर्ण सदनिका उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या गृहप्रकल्पांतर्गत आतापर्यंत ११२८ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सोलापूर महानगर पालिकेच्या हद्दीतील शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी या गृहप्रकल्पांतर्गत ८ इमारतींची उभारणी करण्यात येत आहे यामध्ये एकूण २५२ सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी २२० सदनिकांचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील राबविण्यात येणारा हा प्रकल्प म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगारांकरिता हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करणारा प्रकल्प ठरतो. सोलापूर जिल्ह्यातील हे दोन्ही प्रकल्प हरित पट्ट्यामध्ये गृहप्रकल्प राबविण्यात येत असल्याने जमीन स्वस्त दरात उपलब्ध झाली आहे. यामुळे लाभार्थी सदनिका धारकास रु. १ लाख प्रती सदनिकेच्या किंमतीमध्ये बचत झाली आहे. असंघटित क्षेत्रातील ८११ बांधकाम मजुरांना कामगार विभागामार्फत रु. २ लाखांचे अतिरिक्त अनुदान प्राप्त झाले आहे. राज्य शासनाने नगरोत्थान योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा कामांसाठी म्हाडाकडे जबाबदारी सोपविली यामुळे गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा या दोन्ही बाबी म्हाडामार्फतच राबविण्यात आल्या. सदर प्रकल्प राबविण्यात येत असतांना आलेल्या अडचणींवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पाचे नियोजन सुकर केले आहे. नागरिकांचे जीवनमान सुखकर होण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांतर्गत सामुदायिक सभागृह, अंगणवाडी, सौरउर्जेवर चालणारे दिवे, मुलांसाठी खेळण्याचे मैदान, बाग व त्यामध्ये व्यायामाकरिता आवश्यक उपकरणे, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सुविधांची उभारणी करण्यात आली आहे.