सोलापुरातील जिल्हा परिषदेत दिसणार महाविकास आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 02:59 PM2019-11-28T14:59:51+5:302019-11-28T15:02:59+5:30

फडणवीस कराराचे काय होणार ? : राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे बळीराम साठे यांची सूतोवाच

Development lead to be seen in Solapur Zilla Parishad | सोलापुरातील जिल्हा परिषदेत दिसणार महाविकास आघाडी

सोलापुरातील जिल्हा परिषदेत दिसणार महाविकास आघाडी

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे५७ वर्षांच्या इतिहासात एससी प्रवर्गाचा उमेदवार अध्यक्ष होण्याचा योग पहिल्यांदाचदहा उमेदवारांपैकी कोण अध्यक्ष होणार याची चर्चा सुरू झाली आहे

सोलापूर :  राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर आता सोलापूर झेडपीतही असा चमत्कार होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. झेडपी स्थापनेच्या ५७ वर्षांच्या इतिहासात एससी प्रवर्गाचा उमेदवार अध्यक्ष होण्याचा योग पहिल्यांदाच आला असून, दहा उमेदवारांपैकी कोण अध्यक्ष होणार याची चर्चा सुरू झाली आहे. झेडपीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बलाबल मोठे आहे. पण असे असतानाही गेल्या वेळेस भाजपच्या व आघाडी सदस्यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला झटका देत अपक्ष संजय शिंदे अध्यक्ष झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याची वेळ आली. आता झेडपी अध्यक्षाचे आरक्षण निघाल्याने लवकरच अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी झेडपीत भाजपचीच सत्ता येईल, असे सूतोवाच यापूर्वीच केले आहे. पण पक्षीय बलाबल व लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील घडामोडी पाहता भाजपला हे शक्य होईल का, याबाबत शंका उपस्थित केली जात असतानाच आता फडणवीस सरकार पायउतार झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे झेडपीतील बळ आणखीन वाढले आहे.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपच्या साक्षी सोरटे (नातेपुते, माळशिरस), आवताडे गटाच्या शीला शिवशरण (हुलजंती, मंगळवेढा), राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल खरात (भोसे, पंढरपूर), त्रिभुवन धाईंजे (वेळापूर, माळशिरस), शिवाजी सोनवणे (पेनूर, मोहोळ), शिवसेनेचे अनिरुद्ध कांबळे (केम, करमाळा) आणि काँग्रेसचे संजय गायकवाड (वळसंग, दक्षिण सोलापूर), रेखा गायकवाड (बोरामणी, दक्षिण सोलापूर), सांगोला आघाडीच्या स्वाती कांबळे (जवळा, सांगोला), संगीता धांडोरे (कडलास, सांगोला) ही नावे आहेत. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भाजपचा अध्यक्ष होईल, असा दावा यापूर्वीच केला होता. 

त्यामुळे भाजपचे उमेदवार सोरटे असतील, असे सांगितले जात आहे. पण आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्रिभुवन धार्इंजे व अतुल खरात यांच्या नावांची चर्चा आहे. इकडे प्रभारी अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण किंवा अक्कलकोट तालुक्यातील अध्यक्ष निवडला जावा, यासाठी चाचपणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पवार यांचा फॉर्म्युला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी जो फॉर्म्युला वापरला तोच झेडपी अध्यक्षपदासाठी वापरला जाणार असल्याचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना सदस्यांना व्हीप बजावल्यावर कोणतीच गडबड होणार नाही. याबाबत या वेळेस सुरुवातीपासून काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे आमचे संख्याबळ आपोआप ३५ होणार आहे, असे ते म्हणाले.

असे आहे पक्षीय बलाबल 
- झेडपीत ६८ सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस: २३, शिवसेना: ५, अपक्ष: ३, भाजप: १४, काँग्रेस: ७, भीमा आघाडी: ३, विकास आघाडी: ३, महायुती: २, जनहित आघाडी: ३, सांगोला आघाडी: ५ असे बलाबल आहे. यातील भाजपचा एक सदस्य कारागृहात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी मंत्री विजयसिंह माहिते-पाटील यांच्या गटाचे ८ सदस्य आहेत. या सदस्यांची भूमिका यात महत्त्वाची आहे. तसेच शिवसेनेचे पाच सदस्य असले तरी करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाचे तीन सदस्य आहेत.

समविचारी आघाडी राहणार का..
- संजय शिंदे यांना अध्यक्ष करण्यासाठी भाजपसोबत समविचारी आघाडीचे सदस्य एकत्र आले होते. त्या वेळेस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक तोंडी करार झाला होता. याप्रमाणे शिंदे अध्यक्ष झाल्यावर इतर पदे मित्र पक्षांना देण्यात आली. पुढील वेळेस भाजपचा अध्यक्ष होईल, असे ठरविण्यात आले. पण आता फडणवीस मुख्यमंत्रिपदावर नसल्याने समविचारी आघाडी अस्तित्वात राहणार का व करार पाळला जाईल का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी झेडपी अध्यक्ष भाजपचाच होईल, असे म्हटले होते. पण बदलती परिस्थिती भाजपची परीक्षा पाहणारी असल्याचे दिसत आहे.  

Web Title: Development lead to be seen in Solapur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.