Deputy Chief Minister Ajit Pawar performed Maha Puja of Shri Vitthal as his wife | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न

ठळक मुद्देकार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi) किंवा देव उठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi) म्हणूनदेखील ओळखली जाते. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या एकूण ६ विणेकांपैकी पांडूरंग (ईश्वर) चिट्टीने श्री.कवडुजी नारायण भोयर (वय ६४, रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) यांची दि. २२/११ / २०२० रोजी मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली आहे

सोलापूर/पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक महापूजा संपन्न झाली. पहाटे अडीच वाजता पूजेला सुरुवात झाल्यानंतर 3.30 वाजण्याच्या सुमारास विठ्ठलाच्या लाईव्ह दर्शनासह महापूजेचा हा सोहळा पार पडला. यावेळी, श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या मानाच्या वारकरी दाम्पत्याचा मान कवडुजी नारायण भोयर ( वय ६४) व कुसुमबाई कवडूजी भोयर ( वय ५५ रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) यांना मिळाला. उपमुख्यमंत्र्यांसमेवत या दाम्पत्यानेही श्री विठ्ठलाची महापूजा केली.  

श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कोरोनाचे सावट असल्याने अतिशय कमी मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाची कार्तिकी एकादशीची महापूजा संपन्न झाली. दरम्यान, यापूर्वी आषाढी एकादशीलाही मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सपत्नीक महापूजा करताना, कोरोनामुळे निवडक व्यक्तींच्या उपस्थितीतच महापूजा संपन्न झाली होती. 

कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi) किंवा देव उठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi) म्हणूनदेखील ओळखली जाते. भगवान विष्णूचं चातुर्मास संपवून कार्तिकी एकादशी दिवशी उठतात. त्यामुळे देव शयनी नंतर चार महिन्यांनी येणारी ही देव उठनी एकादशी देखील खास असते. निद्रा अवस्थेतून उठल्यानंतर पुन्हा नव्या शुभ पर्वाला, विवाह सोहळ्यांना सुरूवात होते.

उपमुख्यमंत्र्यांसोबत श्रींच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी श्रीच्या दर्शन रांगेतून निवडला जातो व त्यांना शासकीय महापूजेची संधी दिली जाते. तथापि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षी कार्तिकी यात्रा मर्यादित व प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करण्यात येत आहे. २५/११/२०२० ते दि.२७/११/२०२० या कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे विणेकरी यांची उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता. त्यानुसार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या एकूण ६ विणेकांपैकी पांडूरंग (ईश्वर) चिट्टीने श्री.कवडुजी नारायण भोयर (वय ६४, रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) यांची दि. २२/११ / २०२० रोजी निवड करण्यात आली आहे. कवडुजी नारायण भोयर हे मागील ९ ते १० वर्षांपासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहे. ते स्वत: व त्यांचे कुटुंबिय देखील माळकरी आहेत. मागील ८ महिन्यांपासून लॉकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करीत आहेत. 

 

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar performed Maha Puja of Shri Vitthal as his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.