लसीकरणानंतर आजारी पडलेल्या सोलापूरमधील विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 06:39 IST2018-12-12T04:38:12+5:302018-12-12T06:39:32+5:30
सरकारतर्फे सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेत गोवर-रुबेलाची लस टोचून घेतल्यानंतर ताप व उलटी येऊन आजारी पडलेल्या ऋषिकेश शिवानंद डोंबाळे (९) या चौथीतील विद्यार्थ्यांचा सोमवारी रात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

लसीकरणानंतर आजारी पडलेल्या सोलापूरमधील विद्यार्थ्याचा मृत्यू
सोलापूर : सरकारतर्फे सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेत गोवर-रुबेलाची लस टोचून घेतल्यानंतर ताप व उलटी येऊन आजारी पडलेल्या ऋषिकेश शिवानंद डोंबाळे (९) या चौथीतील विद्यार्थ्यांचा सोमवारी रात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण केमिकल अॅनालिसीस अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.
ऋषिकेश हा औज (आ) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. शुक्रवारी दुपारी त्याला लस टोचण्यात आली. त्यानंतर त्याला उलटी झाली. सायंकाळी पुन्हा त्याला उलटी झाली व ताप आला. आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी ऋषिकेशला सोलापूर शासकीय रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची प्रकृती बरी होती. शनिवारी पहाटे ३.३० वाजता ऋषिकेश बेडवरून उठला व आईच्या कुशीत जाऊन झोपला. मात्र त्यावेळी त्याचे शरीर पूर्ण थंड पडले होते. आई शोभा डोंबाळे यांनी संबंधित डॉक्टर व नर्सना कल्पना दिली. त्यानंतर ऋषिकेशला आयसीयूमध्ये हलवण्यात आले आणि व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर तीन दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. अखेर सोमवारी रात्री डॉक्टरांनी तो मरण पावल्याचे जाहीर केले. मंगळवारी शवविच्छेदन झाल्यावर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पालकमंत्री देशमुख यांनी ऋषिकेशच्या कुटुंबियाची भेट घेऊन कुटुंबियास पाच लाख रुपये आणि नोकरीचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंसंस्कार करण्यात आले
भंडाऱ्याच्या चिमुकलीचाही मृत्यू
नागपूर : भंडारा येथील आराध्या वाघाये या ११ महिन्याच्या चिमुकलीचाही लस दिल्यानंतर मृत्यू झाला. आराध्याला ५ डिसेंबर रोजी गोवर-रुबेलाची लस देण्यात आली. ६ तारखेला तिची प्रकृती खालवल्यामुळे तिला ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून नागपूर येथील मेडिकलमध्ये भरती केले. ७ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू लसीकरणामुळे झालेला नाही, शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. आणखी एका दहा वर्षाच्या मुलावरही मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.